Narendra Modi-Sharad Pawar-Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha 2024 : मोदी-ठाकरे-पवारांची सोलापूरमध्ये एकाच दिवशी होणार सभा

Pawar-modi-Thackeray Sabha : सोमवारी (ता. 29 एप्रिल) सकाळी पंतप्रधान मोदी यांची भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सकाळी सभा होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी पवार आणि ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे, त्यामुळे सोमवार सोलापूरसाठी हायव्होल्टेज सभांचा असणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 26 April : पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच दिवशी सोलापूरमध्ये येणार आहेत. येत्या सोमवारी (ता. 29 एप्रिल) सकाळी पंतप्रधान मोदी यांची भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सकाळी सभा होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी पवार आणि ठाकरे यांची एकत्रित सभा होणार आहे, त्यामुळे सोमवार सोलापूरसाठी हायव्होल्टेज सभांचा असणार आहे.

सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Loksabha ) भाजपकडून आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे खिंड लढवत आहेत, तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) ह्या नशीब अजमावत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या युवा आमदारांमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे ह्या मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रणिती यांच्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे रणनीती आखत आहेत, ते स्वतः प्रणिती शिंदे यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभेसाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहेत, तसतसे प्रचाराचा ज्वर वाढताना दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांसाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा होत आहेत. त्यातूनच प्रणिती शिंदे यांच्यासाठी बुधवारी (ता. २४ एप्रिल) काँग्रेसचे राहुल गांधी यांची सोलापूरमध्ये सभा झाली. आता भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे सोलापूरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.

सोलापूरमधील होम मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी सकाळी सभा होणार आहे. त्या सभेची जय्यत तयारी भाजकडून करण्यात येत आहे. या सभेत एक लाख लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे. मोदी हे सोलापूरमधून कोणावर निशाणा साधतात, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांची सभा ही 30 एप्रिल रोजी ठरली होती. मात्र, त्यात बदल करण्यात आला आहे. आता हीच सभा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत 29 एप्रिल रोजी संध्याकाळी होणार आहे. प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापूरच्या कर्णिक मैदानावर पवार आणि ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी होणाऱ्या तीन महत्त्वाच्या नेत्यांच्या सभांकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष असणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT