Solapur, 29 March : शिवसेनेशी आघाडी करण्यास हायकमांडला नकारघंटा कळविणारे सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आणि सुनील प्रभू यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहिलेल्या आमदार प्रणिती शिंदे हे आगामी निवडणुकीत शिवसेनेला मदत करतील, यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा?, असा सवाल शिवसेनेचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना उपस्थित केला. त्यामुळे महाविकास आघाडीतही सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येते.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता. 28 मार्च) सोलापुरात मेळावा घेऊन काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. मात्र, तत्पूर्वी विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुकांबाबतही शब्द देण्याचा आग्रह शिवसेना नेत्यांनी धरला, त्यामुळे बैठकीत काही वेळ वातावरण गरम झाले होते. त्यासंदर्भात बोलताना उत्तमप्रकाश खंदारे (Uttamprakash Khandare) यांनी काँग्रेस आणि शिंदेंचे अनुभव कथन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडी स्थापन करण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी नकार दर्शविला होता. तसेच, महाविकास आघाडी म्हणून काम करत असतानाही अविश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही प्रणिती शिंदे गैरहजर राहिल्या होत्या, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ते शिवसेनेला मदत करतील का?, असा सवाल खंदारे यांनी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी काँग्रेस आम्हाला मदत करणार का? की लोकसभेला पडलेल्या मतदानांचा दाखला देत दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करणार. इतर जागांबाबतही काँग्रेस सबुरीचे धोरण घेणार की मागच्या प्रमाणेच पुढेही तसेच अनुभव येणार, असा प्रश्नही माजी मंत्री खंदारे यांनी केला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास
मेळावा घेण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने एक स्ट्रॅटेजी ठरवण्यात आली होती. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेस मदत करणार का? महापालिका, नगरपालिका आणि इतर निवडणुकांत काँग्रेसचे धोरण काय असणार? आगामी काळात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार फंडातून विकासकामांसाठी निधी मिळणार का? , अशी बांधणी करून घ्यायचे ठरविले होते.
ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घालणार
सोलापूर शहरातील तीन पुढाऱ्यांनी ज्यांचा ‘जनवात्सल्य’शी अतिदाट संवाद आहे, त्यांनी संपर्क प्रमुख अनिल काेकीळ आणि इतर पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करून बैठकीचा फार्स केला. केवळ फोटोसेशन करून प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करून काढता पाय घेतला. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहोत, असेही खंदारे यांनी सांगितले.
‘वंचित’कडे मी जाणार नाही
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून माझे नाव चर्चेत असले तरी मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून कोठेही जाणार नाही. ‘मातोश्री’शी निष्ठा राखणारा मी शिवसैनिक आहे, त्यामुळे ‘वंचित’कडून माझे नाव चर्चेत असले तरी मी शिवसेना सोडणार नाही, असेही खंदारे यांनी नमूद केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.