Nashik MLC: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अपक्ष बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढवल्याचे चित्र होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे फर्मान सुटल्याने, थेट सरकारच्या अजेंड्यावरच ही राजकीय घडामोड आली. बंडखोर गिते यांची माघार घडवून आणण्यासाठी महायुतीचे तीन महत्त्वाचे मंत्री शासकीय कामकाज बाजूला ठेवून तब्बल आठवडाभर नाशिकमध्ये तळ ठोकून होते. मात्र, यामुळे शासकीय यंत्रणा आणि जनतेच्या कामांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
महायुतीच्या उमेदवाराचे भवितव्य टांगणीला!
गोकुळ गिते यांनी माघार न घेतल्यास महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचे राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून नरेंद्र दराडे यांना दिलेल्या उमेदवारीची चर्चा आधीच कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती, त्यातच बंडखोरी झाल्याने महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या बंडखोरीचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून आले.
तीन मंत्री 'मुंबई ते नाशिक' येरझाऱ्या घालण्यात व्यस्त
बंडखोर शमवण्यासाठी भाजपचे संकटमोचक आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूर्णवेळ नाशिकमध्ये सक्रिय होते. नाशिकचे स्थानिक मंत्री आणि शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील या मोहिमेत सामील झाले होते, मात्र स्थानिक असूनही त्यांची जादू येथे चालत नसल्याचे दिसून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली. हे तिन्ही मंत्री 'मुंबई ते नाशिक' आणि 'नाशिक ते मुंबई' अशा येरझाऱ्या घालत बंडखोराच्या मनधरणीत व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.
प्रशासकीय कामांची कोंडी झाल्याची चर्चा
मंत्री महोदय पूर्णवेळ या राजकीय गणितांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे त्यांच्या संबंधित खात्यांच्या शासकीय कामकाजाकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते. मंत्री नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे सरकारी यंत्रणा आणि प्रशासनालाही त्यांच्या नियोजनात व्यस्त राहावे लागले. परिणामी, मंत्रालयातील आणि स्थानिक पातळीवरील शासकीय कामांसाठी आलेल्या सामान्य नागरिकांची काही प्रमाणात कोंडी झाली.
पर्याय नसल्याने प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मंत्री महोदय या राजकीय चक्रव्यूहातून कधी मोकळे होतात, याकडे डोळे लावून बसले होते. एका अपक्ष उमेदवाराला माघार घ्यायला लावण्यासाठी राज्य सरकारमधील तीन-तीन महत्त्वाच्या मंत्र्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकल्याने शासकीय कामांकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.