Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंत्रिमंडळाचं बाशिंग बांधून बसलेल्यांवर टाळ्या वाजवायची वेळ! देशमुखांचा गोरेंना टोला

सरकारनामा ब्युरो

दहिवडी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. शरद पवार यांच्यामुळे मंत्रिमंडळाचं बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांवर टाळ्या वाजवण्याची वेळ आली, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांनी भाजपचे (BJP) आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना लगावला आहे.

बिजवडी विकास सेवा सोसायटीतील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रभाकर देशमुख यांनी आमदार गोरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवार यांनी माढ्याच्या खासदारकीच्या काळात माण-खटाव साठी 175 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. त्यामुळे शरद पवारांवर आरोप करून फसवणूक करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करायला हवे. माण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत.

या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, माजी उपसभापती तानाजी कट्टे, सुनिल पोळ, विष्णूपंत अवघडे, सुदाम नारनवर, बाबूराव काटकर, शिवाजीराव महानवर, आनंदराव विरकर, रंगराव भोसले, जयप्रकाश कट्टे आदी उपस्थित होते.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले म्हणाले की, प्रभाकर देशमुख यांनी साखळी सिमेंट बंधाऱ्याचा पहिला प्रयोग लोधवडेत राबविला. त्यांच्याच कल्पनेतून तो संपूर्ण माणमध्ये राबवण्यात आला. शरद पवार यांच्या सावलीत उभं राहण्यांची लायकी नाही ते विचारतात शरद पवारांनी काय केलं? विध्वंसक वृत्तीला साथ द्यायची की विकासाची दृष्टी असलेल्या महाविकास आघाडीला साथ द्यायची हे जनतेने ठरविण्याची वेळ आली आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले म्हणाले की, पैशाच्या राजकारणाचा बिजवडी सोसायटीत सामान्य जनतेने चक्काचूर करुन दाखवला आहे. माणमधील हरित क्रांतीचे श्रेय प्रभाकर देशमुख यांचे आहे. असे असताना नेहमीच इतरांच्या कामाचं श्रेय घेणारे इथले आमदार या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांची पाठ मऊ करण्याचे काम बिजवडीकर यापुढेही करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT