Yashwant Mane
Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार मानेंना आपल्याच शब्दाचा विसर; दीड वर्षानंतरही विजेचा प्रश्न कायम

सरकारनामा ब्यूरो

उत्तर सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांना आपल्याच शब्दाचा विसर पडल्याचे दिसते. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. बक्षीसाच्या रकमेतून गावाला भेडसावणारा विजेचा प्रश्न सोडवता येईल, या आशेतून पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. मात्र, दीड वर्षांनंतरही आमदार मानेंकडून वीजप्रश्न सोडवण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात, त्या होत नसल्याने नागरिकांची घोर निराशा झाली आहे. (NCP MLA Yashwant Mane forgot his own words)

उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावांचा मोहोळ विधानसभा मतदार संघात समावेश आहे. पडसाळी येथील नागरिकांनी आमदार यशवंत माने यांनी केलेल्या आवाहनानुसार ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केली. बिनविरोध ग्रामपंचायतीला २१ लाख रुपयांचे बक्षीस आमदार माने यांनी जाहीर केले होते. गावाला भेडसावणारा विजेचा प्रश्न बक्षीसाच्या रकमेतून सोडवता येईल, ही अपेक्षा ठेवून पडसाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. त्याला दीड वर्षे झाले तरीही विजेचा प्रश्न कायम आहे. ढोबळी मिरची देशभराच्या बाजारपेठेत पाठवणाऱ्या पडसाळी येथील शेतकऱ्यांच्या श्रमाची किमत ना लोकप्रतिनिधींकडे होताना दिसते ना महावितरणकडून. आपला विजेचा प्रश्न राज्यात सत्ताधारी असलेला राष्ट्रवादी पक्षाचे आमदार माने सोडवतील, अशी अपेक्षा गावाला होती. मात्र, मानेंकडून शेतकऱ्यांची घोर करण्यात आली आहे.

आठवड्यातील दोन दिवस आमदार माने हे मतदार संघात येतात. मोहोळ येथे शुक्रवारी, तर सोलापूरमध्ये शनिवारी ते मतदारसंघातील लोकांना भेटतात. आमदार यशवंत माने यांची मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात पडसाळीच्या काही शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. ४ फेब्रुवारी) भेट घेतली. वडाळा आणि कळमण या दोन उपकेंद्रांच्या माध्यमातून पडसाळीला वीजपुरवठा केला जातो. कळमण उपकेंद्रात अतिरिक्त ५ मेगावॉटचा पावर ट्रान्सफार्मर बसविण्याचा प्रस्ताव महावितरणने मुख्य कार्यालयाकडे पाठवला आहे. पडसाळीच्या शेतकऱ्यांनी आमदार माने यांना त्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली.

प्रचंड गर्दीमुळे आमदार माने यांनी त्या शेतकऱ्यांचा प्रश्‍न समजावून न घेता स्वीय सहायकामार्फत उत्तर सोलापूर तालुका महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना फोन लावला. पण, उपकार्यकारी अभियंत्याच्या पातळीवर तो प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. वास्तविक आमदार माने यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलणे अपेक्षित होते किंवा महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन याविषयी पाठपुरावा करणे अपेक्षित होते. मात्र, आमदार मानेंनी प्रश्न न समजून घेता, शेतकऱ्यांना उत्तर दिल्याने त्यांची घोर निराशा झाली आहे.

पावर ट्रान्सफार्मरसंदर्भात ऊर्जामंत्र्यांना पत्र देणार

याबाबत आमदार यशवंत माने म्हणाले की, कळमण येथील पावर ट्रान्सफार्मरच्या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र देणार आहे. तशा सूचना स्वीय सहायकांना देण्यात आलेल्या आहेत.

भाजप आमदाराचा पाठपुरावा ठरला भारी!

यशवंत माने हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. पण, कामे मार्गी लागण्यासाठी सत्तेपेक्षा पाठपुरावा महत्त्वाचा ठरतो, हे अक्कलकोटचे भाजपचा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दाखवून दिले आहे. अशाच प्रकारचे तीन पॉवर ट्रान्सफार्मर त्यांनी आपल्या तालुक्यात मंजूर करून घेतले आहेत. आमदार माने हे सत्ताधारी पक्षाचे असूनही केवळ पाठपुरावा नसल्याने त्यांना हा प्रश्न सोडविण्यात यश येत नसल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT