इंदापूर (जि. पुणे) : राज्यात, पुणे जिल्ह्यात तसेच इंदापूर तालुक्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची नगर परिषदेवर मात्र सत्ता नाही, त्यामुळे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या सोबतीने नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली. मात्र, गारटकरांना मानणारे नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी यांनी ‘गारटकर हेच आमचे नेते,’ असे वक्तव्य करून थेट भरणेंनाच विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. दुसरीकडे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी ज्येष्ठ नेते गोकुळदास शहा यांना दिलेले आश्वासन न पाळल्यानेही तेही पाटलांवर नाराज आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात धूसफूस दिसून येत आहे. (NCP group leader's challenge to Bharane ; Shah's family is still angry on patil)
राज्यमंत्री भरणे यांनी इंदापूर शहर स्वच्छ व सुशोभीकरणाचा नारा दिला आहे, त्यासाठी कोट्यवधींचा निधी देत शहर सुशोभीकरणाचे काम सुरू केले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या इंदापूर शहराचा बारामतीप्रमाणे विकास व्हावा, ही भरणे व गारटकर यांची इच्छा आहे. मात्र, गारटकरांचे समर्थक गवळी यांनी थेट भरणेंवर बॉम्ब टाकला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने इंदापूर तालुक्यात साखळी पद्धतीने ई निविदा काढून उच्च न्यायालय आदेशाचा भंग केला आहे. तसेच, साखळी पध्दतीने ई निविदा काढल्याने छोटे कॉन्ट्रॅक्टर हे देशोधडीस लागतील, असे गटनेते गजानन गवळी यांचे म्हणणेआहे, त्यामुळे राष्ट्रवादीतील बेदिली उघड झाली आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा या मागील निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर जनतेतून नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी स्वच्छता अभियानात सलग चार वर्षे शहरास देश पातळीवरील पुरस्कार मिळवून दिला आहे. त्यांचे नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. नगराध्यक्षा अंकिता शहा या दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे कट्टर समर्थक गोकुळदास शहा यांच्या सूनबाई, तर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या पत्नी आहेत. कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा हे त्यांचे दीर आहेत. इंदापूर शहर व परिसरातील ४५ गावात शहा कुटुंबाचे मोठे योगदान आहे.
राजीनाम्यावर तीन महिने सूचक मौन
हर्षवर्धन पाटील यांचा २०१९ मध्ये विधानसभेला दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर इंदापूर नगरपरिषदेवर शहा परिवाराने काँग्रेसचा झेंडा फडकवून पाटील यांना बळ दिले. मात्र त्यानंतर इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांचे सह्यांचे अधिकार हर्षवर्धन पाटील यांनी काढून घेतल्यानंतर इंदापूर अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष भरत शहा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. विशेष म्हणजे पाटील व शहा यांचे तीन पिढ्यांचे संबंध असताना पाटील यांनी शहा यांच्या राजीनाम्यावर तीन महिने सूचक मौन बाळगले.
शहा-पाटील कुटुंबात बेबनाव कायम
कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होताच कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकुळदास शहा व शहा कुटुंबाची पुन्हा मदत व्हावी; म्हणून पाटील यांनी पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांना मध्यस्थी करण्यास लावली. ही मध्यस्थी यशस्वी होवून शहा व पाटील कुटुंबात दिलजमाई झाली. त्यावेळी आमची संस्था आमच्या ताब्यात द्या, ही ज्येष्ठ नेते गोकुळदास शहा यांची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी तत्त्वता मान्य केली. कर्मयोगीची निवडणूक संपताच सचिव मुकुंद शहा यांना पुन्हा अधिकार दिले जातील, असे आश्वासन पाटील यांनी दिले होते. मात्र, अद्याप पाटील यांनी शहा यांना अधिकार न दिल्याने शहा कुटुंब नाराज आहे. त्यामुळे अंतर्गत बेबनाव आहे.
धारिवाल पॅटर्नची शहा समर्थकांची मागणी
हर्षवर्धन पाटील यांची सध्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना त्यांनी बेरजेचे राजकारण करणे गरजेचे आहे. मात्र, ते होत नसल्याने इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. शहा कुटुंबाने इंदापूरच्या विकासासाठी रसिकलाल धारिवाल पॅटर्न अवलंबावा, अशी बहुसंख्य शहा समर्थकांची मागणी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.