Jayant Patil and Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Politics: शरद पवारांपुढे राष्ट्रवादीची पडझड रोखण्याचे आव्हान ? ‘त्या’ फुटीर माजी नगरसेवकांना कार्यक्रमाचं निमंत्रण

सरकारनामा ब्यूरो

अनिल कदम

Sangli News: महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, महापालिका क्षेत्रात दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे समर्थक अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. त्यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश झाला नसला तरी भविष्यात त्यांचा प्रवेश निश्चित आहे.

या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सांगलीच्या दौर्‍यावर येत आहेत. अजित पवारांच्या संपर्कात असलेल्या माजी नगरसेवकांना देखील कार्यक्रमाला बोलावले आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीतील पडझड रोखण्यासाठी काय कानमंत्र देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील दीड वर्षात राज्याच्या राजकारणात झपाट्याने बदल होत चालले आहे. शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट विभक्त झाला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली. यांनतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले. शरद पवार व अजित पवार यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी राज्यात मेळावे, सभा, बैठका सुरू केल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी देखील झाल्या. राज्यातील या फुटीचा परिणाम सांगली ग्रामीण व शहरी भागात झाला. विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी जयंत पाटील यांची साथ सोडून अजित पवारांना जाहीर पाठिंबा दिला. तर मनपा क्षेत्रातून माजी महापौर इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे आदींनी अजित पवार गटात प्रवेश केला. सध्या या नेत्यांवर मोठी जबाबदारी दादांनी दिली आहे.

वैभव पाटील यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर पद्माकर जगदाळे यांना शहर जिल्हाध्यक्ष केले आहे. तर दुसरीकडे इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिले आहे. या तिन्ही नेत्यांनी महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर 13 माजी नगरसेवक देखील आहेत. हे देखील अजित पवारांच्या संपर्कात आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची साथ सोडली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.

जयंत पाटील हे शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यभर काम करत आहेत. पण त्यांच्या जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती ही मोठी जखम आहे. एकेकाळी महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचा दबदबा होता. राष्ट्रवादीची ताकद ज्यांच्या मागे तोच उमेदवार लोकसभा व विधानसभेला निवडून येत होता. 2008 च्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी जयंत पाटील यांनी केलेली महाविकास आघाडीची खेळी यशस्वी झाली होती. पण आता राज्यात राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाल्याने शरद पवार गटाला गळती लागली आहे.

भविष्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला आपले अस्तित्व ठेवावे लागणार आहे. अजित पवार गटात प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले नाराज माजी नगरसेवकांची मनधरणी करावी लागणार आहे. मंगळवारी शरद पवार सांगलीच्या दौर्‍यावर येणार आहेत. स्टेशन चौकात राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे.

या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला नाराज माजी नगरसेवकांना पक्षाने निमंत्रण दिले आहे. ते कार्यक्रमाला येऊ शकतात. त्यामुळे नाराज असलेल्या माजी नगरसेवकांशी शरद पवार चर्चा करून पडझड रोखण्यासाठी प्रयत्न करणार काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.

‘राजारामबापूं’च्या पुतळ्यासाठी आग्रही असलेले अजित पवार गटात

महापालिका क्षेत्रात राजारामबापू पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आग्रही होते. त्यांनी अनेक महासभेत पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी विषय मांडला होता. महापौर झाल्यानंतर त्यांनी स्वत:यासाठी पाठपुरावा केला. एक समिती देखील नेमली. त्यांना सभागृहातील नगरसेवक व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी साथ दिली. शासन मंजुरी झाली आणि पूर्णाकृृती पुतळा उभारला गेला, पण या पुतळ्याचा अनावरण सोहळा होण्यापूर्वीच सूर्यवंशी व समितीच्या सदस्यांनी अजित पवार गटाशी सलगी केली आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT