Sharad Pawar-Baliram Sathe-Mahesh Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

साठे-कोठेंच्या भेटीनंतर पवारांचा तातडीने सोलापूर दौरा; मानेंच्या प्रवेशाकडे लक्ष!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.

प्रमोद बोडके

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा शुक्रवारी (ता. २५ मार्च) सोलापूर दौरा जवळपास निश्‍चित झाला आहे. दौऱ्याचा निरोप प्रदेश कार्यालयातून सोलापूर राष्ट्रवादीत आला तरीही त्या कार्यक्रमात प्रवेश कोणाचा? हे मात्र अद्यापही निश्‍चित झाले नसल्याचे समजते. पवारांच्या दौऱ्यात ठराविक व्यक्तींनाच अधिक महत्व आल्याने राष्ट्रवादीतील वातावरण धुपायला सुरुवात झाली आहे. (NCP president Sharad Pawar will visit Solapur on Friday)

जिल्हाध्यक्ष बळिराम साठे (Baliram Sathe) यांनी माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) व माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांना घेऊन गुरुवारी (ता. १७ मार्च) मुंबई गाठली. सिल्व्हर ओकवर जाऊन या तीन ‘के’ मंडळींनी शरद पवारांची भेट घेतली. पण, या दौऱ्यात काय चर्चा झाली? याबद्दल कमालीचे मौन बाळगण्यात आले आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या समर्थकांनी घड्याळ आणि शरद पवार यांचे फोटो लावून वातावरण निर्मिती सुरू केली आहे. माने यांचा प्रवेश होणार का?, जिल्हाध्यक्ष साठे व त्यांचे समर्थक माने यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर काय करणार? याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शरद पवार हे शुक्रवारी दिल्लीतून थेट सोलापुरात विमानाने येणार असल्याचे समजते. सकाळी ११ ते दुपारी १ हा वेळ सोलापुरातील मेळाव्यासाठी त्यांनी निश्‍चित केल्याचे समजते. मेळाव्यात कोणा-कोणाचे प्रवेश होणार? याबद्दल कमालीचे मौन पाळण्यात आले आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांत सत्ता मिळवून कॉन्फीडन्स वाढलेल्या भाजप कार्यकर्त्यांना आणि कॉन्फीडन्स डाऊन होत असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवार सोलापूरच्या मेळाव्यात काय बूस्ट देणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहर राष्ट्रवादीत सन्नाटा

शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी या दौऱ्यासाठी उद्या (रविवार, ता. २०) सकाळी ११ वाजता पक्ष कार्यालयात बैठक बोलविली आहे. या बैठकीत दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सोलापूरच्या दौऱ्यावर येत असतानाही शहर राष्ट्रवादीत पसरलेला सन्नाटा आगामी काळासाठी चिंताजनक मानला जात आहे.

काँग्रेस, शिवसेना नेत्यांचा तूर्तास प्रवेश नाही : कोठे

शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात कॉंग्रेस व शिवसेनेतील कोणत्याही नेत्यांचा राष्ट्रवादीत तूर्तास प्रवेश होणार नसल्याचे माजी महापौर महेश कोठे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. स्वत: कोठे व माजी आमदार माने शिवबंधन सोडून राष्ट्रवादीत येण्याच्या तयारी आहेत. तांत्रिकदृष्ट्या कोठे यांचा प्रवेश झाला नसला तरीही महापालिका निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादीने त्यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे शुक्रवारच्या दौऱ्यात कोणाचा प्रवेश होणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT