Raju Khare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : ‘मी नावालाच तुतारीवाला’ म्हणणाऱ्या पवारांच्या आमदाराचा जीव अडकलाय शिवसेनेत...केवळ आमदार होण्यासाठीच तुतारी फुंकली!

Raju Khare's appearance on Shiv Sena platform : सिद्धी कदम हिला जाहीर झालेले तिकीट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी देण्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांपुढे आग्रह धरला होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 June : मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर राजू खरे हे अवघ्या 15 दिवसांत आमदार झाले आहेत. त्यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला जाहीर झालेले तिकिट रद्द करण्याचा हट्ट धरला होता. तसेच, खरेंना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता. मात्र, आमदार राजू खरे यांचा जीव शिवसेनेत अडकल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी पक्षाच्या विरोधात वक्तव्ये करणारे खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अक्कलकोटमधील शिवसेनेच्या व्यासपीठावर पुन्हा हजेरी लावली होती. त्यामुळे राजू खरे नेमके कोणाचे, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीपर्यंत राजू खरे (Raju Khare) हे शिवसेनेसोबत होते. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र, महायुतीकडून तत्कालीन आमदार यशवंत माने यांना तिकीट दिल्याने खरे यांना दुसरा पर्याय शोधावा लागला होता. त्याचदरम्यान, शरद पवारांच्या पक्षाकडून माजी आमदार रमेश कदम यांच्या मुलीला तिकिट जाहीर झाले होते.

सिद्धी कदम हिला जाहीर झालेले तिकीट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी देण्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP), शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांपुढे आग्रह धरला. त्यासाठी मोहोळ मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बारामतीत जाऊन पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सिद्धी कदम यांचे तिकिट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी देण्यात आली होती.

सोलापूर जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हवा होती, त्या हवेच्या जोरावरच राजू खरे हे पवार यांच्या पक्षाकडून अवघ्या पंधरा दिवसांत मोहोळ मतदार संघातून आमदार झाले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच त्यांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली होती, त्यामुळे राजू खरेंसाठी झटणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय मिळाले, असा सवाल आमदार खरे यांच्या नव्या भूमिकेमुळे पडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंढरपूरमध्ये आमदार अभिजीत पाटील आणि राजू खरे यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात बोलताना आमदार राजू खरे यांनी प्रथमच आपल्या मनातील भावना जाहीरपणे बोलून दाखवली होती. ‘हा तुतारीवाला नुसता नावालाच आहे. राज्यातील सत्ता सुद्धा आपली आहे, ती सत्ता माझ्या माणसासाठी निश्चितपणे येणार आहे, असे धक्कादायक विधान खरे यांनी निवडून आल्यानंतर अवघ्या काही दिवसांत केले होते. त्यानंतरही त्यांनी अशी विधाने वारंवार केली आहेत. दुसरीकडे, शिवसेनेबद्दलचे प्रेमही त्यांनी कायम असल्याचे दाखवून दिले होते.

पंढरपुरातील कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत खरे यांनी असेच विधान केले होते. ‘मला चुकून तुतारी घ्यावी लागली, मी तीस वर्षे तुमच्या सोबत होते,’ असे त्यांनी गोरे यांना उद्देशून म्हटले होते, त्याचवेळी महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘समोर पत्रकार आहेत’, अशी आठवण करून दिली होती, मात्र खरे यांनी त्यालाही न जुमानता आपल्या विधानावर ठाम राहत ‘समोर पत्रकार असले तर असू द्या’ असे सर्वांसमोर म्हटले होते.

सांगोल्यातील एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमालाही राजू खरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीला मात्र त्यांनी दांडी मारली होती. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सातारचे शशिकांत शिंदे आले होते. मात्र, त्या बैठकीकडेही आमदार खरे यांनी पाठ फिरवली होती.

अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी गुरुवारी (ता.05 जून) शिवसेनेत प्रवेश केला. त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पहिल्या रांगेत आमदार खरे यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांत आमदार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाबद्दल राजू खरे यांना खरंच प्रेम आहे की त्यांचा पूर्वश्रमीच्या शिवसेनेतच जीव अडकलाय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT