Laxman Dhoble Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Laxman Dhoble : लक्ष्मण ढोबळेंवर राष्ट्रवादीने सोपवली राज्याची मोठी जबाबदारी...

NCP Sharadchandra Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते लक्ष्मण ढोबळे यांना निवडीचे पत्र दिले आहे. ढोबळे यांच्या रुपाने दलित चेहऱ्याला पवार यांच्या राष्ट्रवादीने संधी दिल्याचे मानले जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 November : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला ‘जय श्रीराम’ करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यावर पक्षाने संघटनेत मोठी जबाबदारी सोपवली आहे. ढोबळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण ढोबळे यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गेली पाच वर्षे ते भाजपमध्ये होते. मात्र, भाजपत गेल्यानंतर त्यांची अवहेलनाच झाली. पक्षात ते अडगळीत पडले होते. नाही म्हणायला भाजपने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना जो मान सन्मान मिळत होता, तो भाजपमध्ये त्यांच्या वाट्याला आला नाही, हे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाताना लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. विशेष म्हणजे भाजप सोडतानाही त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला होता. भारतीय जनता पक्षात त्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे वागणूक मिळत होती, असा आरोप त्यांची कन्या बहुजन रयत परिषदेच्या कोमल ढोबळे यांनी केला होता.

मोहोळ मतदारसंघातून माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजीत ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली हेाती. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दोन वेळा भेट घेतली होती. मात्र, मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजू खरे यांना उमेदवारी दिली आहे.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनाही मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षाने नवा चेहऱ्याला पसंती दिली आहे. दुसरीकडे, पक्षात नव्याने दाखल झालेल्या लक्ष्मण ढोबळे यांच्याकडे एखादे महत्वाचे पद येणं अपेक्षित होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी ढोबळे यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते लक्ष्मण ढोबळे यांना निवडीचे पत्र दिले आहे. ढोबळे यांच्या रुपाने दलित चेहऱ्याला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने संधी दिल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ढोबळेंवर प्रदेश उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT