Narayan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Narayan Patil Won : ‘तो’ निर्णय ठरला टर्निंग पॉईंट अन्‌ नारायण पाटलांनी 2019 च्या पराभवाचं उट्टं काढलं

Karmala Assembly Election 2024 : नारायण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून खेळलेल्या सर्व खेळी ह्या यशस्वी ठरल्या आहेत. अगदी मागच्या निवडणुकीत संजय शिंदे यांच्यासोबत असणारे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना आपल्या गोटात घेण्याची खेळी महत्वपूर्ण ठरली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 23 November : मागील 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून ऐनवेळी मिळालेल्या धक्का पचवून अपक्ष निवडणुकीला उभे राहिलेले तत्कालीन आमदार नारायण पाटील यांना आमदार संजय शिंदे यांच्याकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पण, लोकसभा निवडणुकीपासून आखलेले नियोजन नव्या ‘मास्टर माईंड’च्या नेतृत्वाखाली खेळलेल्या चाली मागील निवडणुकीची पराभवाची सहानुभूती, पवारांच्या तुतारीची असलेली क्रेझ या सर्व गोष्टी जुळून आल्या आणि नारायण पाटील यांच्या नावासमोर पुन्हा एकदा आमदारकी लागली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

नारायण पाटील यांनी करमाळ्यात 96 हजार 091 एवढी मते घेत विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचा 16 हजार 085 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिंदे यांना 80 हजार 006 मते मिळाली आहेत. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांना 40 हजार 834 मते पडली आहेत.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

करमाळ्याची निवडणूक ही कायम अटीतटीची राहिलेली आहे. निवडून येणाऱ्या आमदार हा काही हजारांच्या फरकानेच निवडून आलेला आहे. करमाळा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नारायण पाटील हे तुतारी घेऊन लढत होते, तर त्यांच्याविरुद्ध संजय मामा शिंदे हे मागील निवडणुकीप्रमाणे अपक्ष रिंगणात होते. मात्र, यावेळी त्यांना अपक्षाचे लेबल निवडून यायला साह्यभूत ठरले नाही.

नारायण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून खेळलेल्या सर्व खेळी ह्या यशस्वी ठरल्या आहेत. अगदी मागच्या निवडणुकीत संजय शिंदे यांच्यासोबत असणारे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना आपल्या गोटात घेण्याची खेळी महत्वपूर्ण ठरली आहे. भाजपकडून वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवूनही माजी आमदार नारायण पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून तुतारीसोबत एकनिष्ठ राहिले आहेत. त्याचेच फळ त्यांना विधानसभा निवडणुकीतील विजयातून मिळाले आहे.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध काढत झालेला तह करमाळ्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरला होता. तिथून फिरलेली सूत्रे आणि तुतारीची क्रेझ यामुळे नारायण पाटील यांना करमाळा विधानसभेची निवडणूक तुलनेने सोपी गेल्याचे दिसून येत आहे.

आमदार संजयमामा शिंदे यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या माढा तालुक्यातील 34 गावांतही नारायण पाटील यांनी बऱ्यापैकी मतदान घेतल्याचे दिसून येत आहे. मागच्या निवडणुकीत याच गावांत नारायण पाटील यांना फटका बसला होता. मागील निवडणुकीतील ती गोष्ट लक्षात घेऊन नारायण पाटील यांच्याकडून यावेळी या 34 गावांत पुरेशी काळजी घेतली होती.

मोहिते पाटलांची ताकद निर्णय

सोलापूरवर वर्चस्व गाजलेल्या मोहिते पाटील यांचे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये समर्थक आहेत. त्यातही करमाळा मतदार संघात त्यांना मानणाऱ्यांचा मोठा समूह आहे. तेच मोहिते पाटील पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचा फायदा नारायण पाटील विधानसभा निवडणुकीत दिसून आला. करमाळ्याबरोबर माढा तालुक्यांतील 34 गावातही चांगले मतदान झाल्याने नारायण पाटील यांनी विजयश्री खेचून आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT