Karad, 20 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शशिकांत शिंदे हे शनिवारी प्रथमच सातारा जिल्ह्यातील कराड येथे आले होते. कऱ्हाडमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर शिंदे यांनी प्रथम (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. ‘यशवंतराव चव्हाण यांनी उभा केलेला महाराष्ट्र त्यांच्या विचाराने पुन्हा उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी मी आलो आहे. जातीयवाद्यांच्या ताब्यातून महाराष्ट्र मुक्त व्हावा,’ अशी प्रार्थना आमदार शशिकांत शिंदे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी केली.
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमाशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्याने (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम करून पाठींबा दिला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने महाराष्ट्र पुन्हा उभा करण्याचे काम आम्ही करणार आहोत.
शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संकटाच्या काळात सात वर्षे समर्थपणाने पक्ष सांभाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर तेवढ्याच ताकदीने त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत पक्षवाढीचे काम केले आहे. विकास आणि धर्मवादाच्या नावाखाली उद्योगपतींचा महाराष्ट्र होतो की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीच्या तोंडावरच माझ्या अंगावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पडली आहे. त्यामुळे पक्ष आणि संघटना मजबूत करण्याला माझे प्राधान्य असणार आहे. तसेच, पक्षाची विचारधारा, पक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत नेण्याचे काम मला अत्यंत कमी कालावधीत करावे लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले
याच काळात सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते मार्गी लावण्याचे कामही करावे लागणार आहे. पुण्यात नुकतेच पक्ष मजबुतीसाठी तीन दिवस बैठका घेतल्या आहेत, त्यातील व्यूहरचनेप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पक्ष वाढीसाठी दौरे करणार आहे, असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
स्थानिकसाठी जिल्हा पातळीवर निर्णय
आगामी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्याने घ्यावा. त्याबाबतचा निर्णय पक्षाला कळविण्यात यावा, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेत्यांशी एकत्रित बसून प्राथमिक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर आघाडीचा निर्णय होईल, असेही शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.