
Solapur, 19 July : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्या खांद्यावर जिल्हाध्यपदाची धुरा सोपवली. त्यांच्या या निर्णयामुळे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील गट कमालीचा दुखावला. मात्र, त्याबाबतची नाराजी उघडपणे बोलून न दाखवता त्यांनी सोलापूर शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर शहारातील कार्यकारिणीला हाताशी धरून राजन पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना शह देण्याची मोठी खेळी खेळली आहे. त्यातूनच सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी ठळकपणे दिसून येत आहे.
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असून एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही सोडत नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानामुळे उमेश पाटील हे दुखावले होते, त्यातून त्यांनी पक्षापासून लांब राहणे पसंत केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतर उमेश पाटील हे पुन्हा अजित पवारांसोबत गेले.
विधानसभा निवडणुकीत राजन पाटील पर्यायाने तत्कालीन आमदार यशवंत मानेंच्या विरोधात उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मोहोळ तालुक्यात स्थानिक आघाडी उभारण्यात पुढाकार घेतला होता. तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र आल्याने राजन पाटील यांचे उमेदवार मानेंचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात आघाडी उभारणाऱ्या उमेश पाटील यांच्याकडेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोपविल्याने राजन पाटील गट अस्वस्थ झाला होता.
उमेश पाटील यांच्या नियुक्तीला उघडपणे विरोध न करता पक्षात राहून विरोध करणे राजन पाटील यांनी सुरू ठेवले आहे. सोलापूर शहराचे पदाधिकारी संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान आणि कार्यकारिणीचे उमेश पाटील यांच्यासोबत सख्य नसल्याचे त्यांच्या दौऱ्यातून दिसूनआले होते. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील सोलापूर शहरात आल्यानंतर त्यांच्या स्वागताला शहरातील राष्ट्रवादीचे (NCP) पदाधिकारी गेले नव्हते, त्यामुळे पवार आणि पाटील यांच्यातील मतभेद दिसून आले होते.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील हे पाच जुलै रोजी सोलापूर शहरात आले होते. त्यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते. माजी आमदार यशवंत मानेही त्यावेळी सोबत होते. तसेच, राजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.
राजन पाटील यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी सोलापूर शहरातील पार्क चौकातील संतोष पवार यांच्या संपर्क कर्यालयात सदिच्छा भेट दिली होती. बाळराजे यांचे शहराध्यक्ष पवार आणि कार्याध्यक्ष बागवान यांनी स्वागत केले होते. सोबत शहराची संपूर्ण कार्यकारिणी बाळराजेंच्या स्वागताला उपस्थित होती. या भेटीत त्यांच्यात राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा झाली.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गटबाजी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यातच उमेश पाटील यांनी राजन पाटील कुटुंबीयांना असणारा विरोध कायम राहील, असे स्पष्ट केले होते, त्यामुळे पाटील कुटुंबीय सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या मदतीने उमेश पाटील यांच्या विरोधात नव्याने संघर्ष करताना पहायला मिळू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.