Solapur, 31 January : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे त्यांच्या विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहेत. एकीकडे त्यांनी स्वपक्षाच्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली आहेत, तर भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही शिंगावर घेतले आहे. मोहोळमधील मालकशाही संपवली, आता पंढरपूरमधील मालकशाही संपवायची आहे, असे आव्हान त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारकांना दिले. पण, परिचारकांनीही तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पंढरपूर-मोहोळच्या राजकारणात खरे यांनी दोन मालकांना दिलेले आव्हान आता कुठपर्यंत जाणार, याची चर्चा रंगली आहे.
पंढरपूर येथील सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आमदार राजू खरे (Raju Khare) यांनी ‘मी नावालाच तुतारीवाला आहे,’ असे धक्कादायक वक्तव्य केले होते. त्यानंतर पक्षातील काही नेत्यांकडून खासगीत नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे ‘मोहोळमधील मालकशाही आम्ही मोडीत काढली आहे. आता पंढरपूरमधील मालकशाही संपवायची आहे,’ असेही वक्तव्य खरे यांनी त्याच कार्यक्रमात केले होते. त्यातून नव्यानेच आमदार झालेले राजू खरे यांनी मोहोळमधील माजी आमदार राजन पाटील आणि पंढरपूरमधील माजी आमदार प्रशांत परिचारक या दोन मालकांना एकाच वेळी शिंगावर घेतले आहे.
माजी आमदार राजन पाटील यांनी स्वभावाप्रमाणे राजू खरे यांना प्रत्युतर दिले नाही. पण, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी आमदार खरेंना जोरदार प्रत्युतर दिले आहे. पंढरपूर तालुक्यातील नेते बदलले, विरोधक बदलले. मात्र, आम्ही आहे त्याच ठिकाणी आहोत. पण विरोधक कुठे आहेत, याची तपासणी एकदा करा, असे प्रतिआव्हान माजी आमदार परिचारक यांनी विरोधकांना दिले आहे.
परिचारक कुटुंबाला या सर्वांसोबत लढण्याची सवय झाली आहे. मात्र, विरोधक आणि नेते बदलले. पण आम्ही आहे त्याच ठिकाणी आहोत. विरोधक कोठे आहेत, याची खातरजमा एकदा विरोधकांनी करावी, असे आव्हान त्यांनी खरे यांना दिले. तसेच, द्वेषाचे राजकारण फार काळ टिकत नाही. कोणाचा तरी द्वेष करायचा, कोणाला तरी संपवायाचं म्हणून तुम्ही राजकारण करत असाल तर ते फार काळ चालत नाही, असा इशाराही त्यांनी खरेंना दिला.
दरम्यान, खरे यांनी एक आक्षेपार्ह शब्दही उच्चारला आहे, त्यावरून परिचारक समर्थक आक्रमक झाले आहेत. खरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ते करत आहेत. खरे यांनी त्याचेही समर्थन करताना पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून कोणत्या जमिनीवर कशी आरक्षणे टाकण्यात आली. ती कशी बदलण्यात आली, याबाबतचा गौप्यस्फोट मी विधानसभेत करणार आहे, असा इशाराही खरे यांनी दिला आहे, त्यामुळे पंढरपूरमधील खरे-परिचारक वाद थांबण्याऐवजी पेटण्याची चिन्हे अधिक आहेत.
खरेंची स्वपक्षाबाबतची वाद्ग्रस्त विधाने
पंढरपूरमधील जाहीर कार्यक्रमात ‘मी नावालाच तुतारीवाला आहे,’ असे विधान करणारे आमदार राजू खरे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीतही सर्व पत्रकरांच्या उपस्थितीत ‘मला चुकून तुतारी हाती घ्यावी लागली आहे. मी तुमच्यासोबत ३५ वर्षे होतो,’ असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे पत्रकारांची उपस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकरांनी निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी हे विधान केले आहे, हे मात्र विशेष.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.