Asaduddin Owaisi-Farooq Shabdi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MIM Politic's : ‘एमआयएम’मध्ये नवा ट्विस्ट; ओवेसी अन्‌ नव्या नगरसेवकांच्या मनातही फारूक शाब्दी पुन्हा...!

Solapur Political News : भाजपच्या त्सुनामीतही एमआयएमने सोलापूर महापालिकेत दुसरे स्थान मिळवले. नगरसेवकांची संख्या कमी झाली असली तरी दमदार कामगिरीमुळे एमआयएमच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

प्रमोद बोडके

Solapur, 17 January : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या त्सुनामीसमोर अनेक पक्षांचे बेहाल झाले. पण त्या लाटेतही एमआयएमने दोन नंबरचे स्थान मिळविले आहे. पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 09 वरून 08 झाली असली तरी एमआयएमच्या महापालिकेतील दमदार कामगिरीने सर्वांनाच जोरदार धक्का दिला आहे.

नव्या नगरसेवकांनी पालिकेतील विजयाचे श्रेय माजी शहराध्यक्ष फारुक शाब्दी (Farooq Shabdi) यांनाही दिले आहे. तसेच, खुद्द पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही त्यांचा राजीनामा अजूनही स्वीकारला नसल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, त्यामुळे एमआयएमच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

फारूख शाब्दी यांनी सोलापूर (Solapur) शहर मध्य मतदारसंघातून एमआयएमकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मागे टाकत तब्बल ६१ हजार ४२८ मते घेतली होती. मतांची संख्या वाढली; पण आमदारकी हुकल्याने एमआयएम समर्थक अस्वस्थ होते.

शाब्दी यांनी विधानसभेतील पराभव विसरून सोलापूरचे शहराध्यक्षपद कायम ठेवून मुंबई अध्यक्ष आणि राज्याच्या कार्याध्यक्षाची जबाबदारी सांभाळली होती. महापालिका निवडणुकीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यापासून उमेदवार ठरविण्यापर्यंत शाब्दी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यानच्या काळात सोलापूरमध्ये उमेदवार ठरवताना त्यांचे स्थानिक नेत्यांशी मतभेद झाले. त्यांचे शौकत पठाण यांच्याशी असलेले संबंध आणि फिरदोस पटेल यांच्यामुळे शाब्दी यांनी एमआयएमच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन शांत राहणे पसंत केले.

महापालिका निवडणुकीत एमआयएमने २५ उमेदवार मैदानात उतरविले होते. शाब्दी यांनी एमआयएमच्या निष्ठावंत उमेदवारांसाठी सर्वार्थाने मदत केल्याचे आता समोर येऊ लागले आहे, त्यामुळे या निवडणुकीत विजयी झालेले तौफिक हत्तुरे, अझहर हुंडेकरी, आसिफअहमद शेख यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय प्रभागातील मतदार, खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यासोबत माजी शहराध्यक्ष शाब्दी यांनाही दिले आहे. एमआयएमच्या विजयी नगरसेवकांच्या मुखात शाब्दींचे नाव आल्याने पक्षाच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.

सोलापुरातील एमआयएमचे नेतृत्व कोणी करायचे, या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही प्रलंबित असल्याचे दिसते. सोलापुरातील एमआयएमचे नेतृत्व सुरवातीला तौफिक शेखनंतर फारुक शाब्दी आणि काही दिवस शौकत पठाण यांच्याकडे आले होते. आता पुन्हा एकदा हे नेतृत्व शाब्दी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

पालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून अकिला अ. कादर भागनगरी, आसीफअहमद पीरअहमद शेख, वहिदा बानो कासीमसाब शेख, तौफिक बाबूमियाँ हत्तुरे, प्रभाग २० मधून चौधरी सफीया मोहम्मद शफीक, अनिसा निजाम मोगल, अजहर अ. गनी हुंडेकरी, अझरोद्दिन सज्जाद अहमद जहागीरदार हे विजयी झाले आहेत.

ओवीसींचा भरसभेत कार्यकर्त्यांना शब्द

खासदार असदुद्दीन ओवेसी हे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापुरात आले होते. त्या सभेत कार्यकर्त्यांनी फारूक शाब्दींच्या नावाने घोषणाबाजी केली होती. त्यावेळी ओवेसी यांनी फारूक शाब्दींचा राजीनामा अद्याप मी स्वीकारला नाही, त्यांच्या वडिलांशी चर्चा करून त्यांच्याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. शाब्दी यांनीही राजीनामा दिल्यानंतर इतर पक्षात जाणे टाळले होते. ओेवेसी यांनीही शाब्दींसोबतची नाळ तुटू दिलेली नाही, त्यामुळे येत्या काळात काय काय घडामोडी होतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT