Markadwadi Voting - Uttam Jankar-Ram Satpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Markadwadi Voting : मारकडवाडी प्रकरणाला नवे वळण; फक्त पेटीवर घालवायचंय, सातपुतेंनी व्हायरल केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे वाद वाढणार

Ram Satpute Viral Audio clip : या संवादातून जानकर समर्थक हे एका नागरिकाला मतदानासाठी येण्याचे आवाहन करत आहे. त्यात निष्पन्न काहीच होणार नाही. फक्त उत्तम जानकरांच्या विरोधात मतदान गेलं आहे की ईव्हीएम मशीनचा दोष आहे, हे पाहायचे आहे, असे तो कार्यकर्ता बोलताना दिसून येत आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 December : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनवर संशय घेत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाच्या कडक धोरणामुळे ग्रामस्थांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. या सर्व प्रकरणाला कलाटणी देणारी एक ऑडिओ क्लिप माजी आमदार राम सातपुते यांनी व्हायरल केली आहे. त्यात आमदार उत्तम जानकरांचा कार्यकर्ता मतदान करण्याचे आवाहन करताना फक्त ईव्हीएम पेटीवर घालवायचंय, असे बोलताना दिसून येत आहे.

माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी मतदानाच्या अगोदर आमदार उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते आबा सोपान मारकड आणि मारकडवाडीचे मतदार यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात मारकड हे संबंधित नागरिकाला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहे. दरम्यान, ‘सरकारनामा’ या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेबाबत पुष्टी करत नाही.

या संवादातून उत्तम जानकर (Uttam jankar) समर्थक हे एका नागरिकाला मतदानासाठी येण्याचे आवाहन करत आहे. त्यात निष्पन्न काहीच होणार नाही. फक्त उत्तम जानकरांच्या विरोधात मतदान गेलं आहे की ईव्हीएम मशीनचा दोष आहे, हे पाहायचे आहे. फक्त पेटीवर घालवायचे आहे, असे तो कार्यकर्ता बोलताना दिसून येत आहे, त्यामुळे मारकवाडीतील बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळताना दिसून येत आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार उत्तम जानकर समर्थक आबा मारकड आणि मारकडवाडीच्या नागरिकामध्ये झालेला संवाद

आबा मारकड (उत्तम जानकर समर्थक) : आम्हाला उत्तम जानकर यांनी बोलावून घेतलं. बोलावून घेतल्यावर मारकडवाडीचं मत एवढं कसं वाया गेलं. मला मारकडवाडी कधीच सोडत नाही, तर मशीनचा दोष आहे. इतकं पळाला... इतकं पळाला. पैसे भरण्यापासून मला सगळं माहिती आहे.

नागरिक : हो तुम्हा होता की...

आबा मारकड : आपण होतोच तर... एवढं इलेक्शन झालं, मी आलो का तुमच्याकडं. नाही तर मी उत्तम जानकर यांचं इतकं काम केलंय की गावात कुणीच केलं नाही. एवढं काम मी त्यांचं केलं आहे. आता निवडणूक झालीया...

नागरिक : होय झाली की...

आबा मारकड : गावात उद्या इलेक्शन घ्यायचं ठरलं आहे. फिक्स झालंय. इलेक्शन म्हणजे काय करायचं, माहिती आहे का? खरंच उत्तमरावच्या विरोधात मतदान गेलंय का की पेटीचा दोष आहे. फक्त पेटीवर घालवायचं आहे. फायदा झाला अन आता तुमचा तोटा झाला आहे.

नागरिक : आमचा तोटा झाला आहे, त्यामुळे आम्ही कशासाठी आबदायचं?

आबा मारकड : बरोबर आहे की. मी सांगातोय म्हणून इवढीभार आबदा. त्यातून निष्पन्न काही होणार नाही. फक्त मत येऊन करायचं आहे.

नागरिक : आम्ही कशासाठी करायचं मतदान?

आबा मारकड : आम्ही सांगतोय म्हणून....

माळशिरस विधानसभेतील मारकडवाडी गावातील उत्तम जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा बॅलेट पेपर मतदानाचा हेतू या क्लिप द्वारे स्पष्ट होत आहे. फक्त ईव्हीएम पेटीवर घालवायचंय, असा दावाही माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. त्यामुळे मारकडवाडी प्रकरणाची गूढता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT