sexual harassment case Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा! नराधमांनी केलेला कॉलच ठरला जीवघेणा

Atpadi Suicide Case : आटपाडी तालुक्यात एका 10 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने गावातील चार तरूणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यातील एका तरूणाने तिच्यावर बलात्कार केला होता.

Aslam Shanedivan

Sangli Crime News : आटपाडी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने घरात घळफास घेऊन आत्महत्या केली होती. धक्कादायक बाब म्हणजे गावातील चार तरूणांनी तिला शारीरीक आणि मानसिक त्रास दिल्याने ती तणावाखाली होती. तर सततच्या शारीरीक संबंधाच्या मागणीमुळे कंटाळून तिने हिने टोकाचे पाऊल उचलले. यानंतर ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या केल्यानंतर त्या चार नराधमांवर गुन्हा दाखल झाला. आता या घटनेत आणखी धक्कादायक बाब समोर आली असून घटनेच्या रात्री त्या नराधमांनी तिला फोनकरून त्रास दिला होता. ज्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असून ती बेकरी आणि एक खोली सील केली आहे. (New shocking details emerge in the Atpadi minor girl suicide case, as police reveal the accused harassed her by phone on the night of her deat)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एका गावात या पीडित युवतीचे कुटुंब राहत असून येथे ती शाळेला जात होती. यंदा 10 वीचं वर्ष असल्याने ती शाळेला वेळेवर जात होती. तर शाळा सुटताच घरी परतत होती. पण मुख्य आरोपी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात, अनिल नाना काळे या टवाळखोरांनी तिला त्रास देणं सुरू केलं होतं. पण शाळेत हूशार आणि खेळात चपळ असणाऱ्या विद्यार्थीने तिकडे दुर्लक्ष करत अभ्यासाकडे लक्ष घातले होते. पण राजू गेंड याने या मुलीला त्रास देणं सुरूच ठेवलं. तसेच एक दिवस हेरून तिच्यावर बळजबरी करत गावातील एका खोलिवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार तिच्या लहान बहिणीच्या डोळ्यासमोर करण्यात आला. फक्त बलात्कारच केला नाही तर त्या घटनेचा व्हिडीओही तयार केला.

हाच व्हिडीओ या मुलीच्या जीवनाचा अंत ठरला आहे. त्या व्हिडीओच्या माध्यमातून मुख्य आरोपी राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात, अनिल नाना काळे तिला सततचा त्रास देण्यास सुरूवात केली. तर शरीर संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरत होते. तसेच शरीर संबंध न ठेवल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्यासह बापाला जीवे मारण्याची धमकी देत होते. तर अत्याचाराची माहिती कोणाला दिल्यास तिलाही जीवे मारण्याची धमकी राजू गेंड याने दिली होती. या सर्व त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या रात्री तिने सर्व हकीकत आपल्या वडिलांना जेवताना सांगितली. त्यानंतर सकाळी पोलिसांना याची माहिती देवून तक्रार देण्याचे ठरले होते. पण त्याच्याआधीच त्या मुलीने आपले जीवन संपवले. आता या घटनेत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

शेवटच्या रात्री दोघी बहिणी एकत्र झोपल्या होत्या, त्याचवेळी संशयितांचे फोन येत होते. संशयितांनी त्या शेवटच्या रात्री 11 पर्यंत सतत फोन करून मुलीला त्रास दिल्याचे उघड झाले आहे. ‘त्या’ रात्री अकरापर्यंत फोन, व्हॉट्सअॅपवर तिला मेसेज केले गेले. या त्रासाला कंटाळून मुलीने फोन बंद केला. ही माहिती पोलिसांनी पीडित मुलीच्या लहान बहिणीचा जबाबही नोंदवला आहे. यामुळे आता तालुक्यात घटनेचे तीव्र पडसाद उमटलेत.

टवाळखोरांचा अड्डा

दरम्यान पोलिसांनी पीडित मुलीच्या लहान बहिणीच्या जबाबानंतर घटनास्थळ असलेली खोली, बेकरी यांची तपासणी करून ती सील केली आहे. मुख्य आरोपी राजू गेंड, रामदास गायकवाड यांना अटक केली आहे. रोहित सर्जेराव खरात, अनिल नाना काळे हे पसार आहेत. दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध लागलेला नाही. तर पोलिसांच्या कारवाई वेळी बघ्यांची गर्दी झाली होती. मुख्य आरोपी राजू गेंड याची गावात बेकरी असून येथे रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात, अनिल नाना काळे बसत असत. ही बेकरी, तेथील खोली या टवाळखोरांचा अड्डा बनली होती.

पोलिसांकडून दखल नाही

अल्पवयीन विद्यार्थिनीने घरात घळफास घेऊन आत्महत्या केली. पण त्याच्यामागे असे धक्कादायक घटना असल्यानेच पोलिसांनी आधी याकडे दुर्लक्ष केले. प्राथमिक तपासात आणि शवविच्छेदनानंतर तिची आत्महत्या म्हणून नोंद केली. पण पीडितेच्या वडिलांसह नातेवाइक आणि ग्रामस्थांनी मुलांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची सांगितले आणि सकाळी 11 पासून रात्री 11 पर्यंत ठिय्या मारला. तेव्हा कुठे पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला. तोपर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात मुलीचा मृतदेह होता.

पोलिसांकडून कसलीच हालचाल नाही

12 तास पोलिस ठाण्याबाहेर पीडित मुलीचा मृतदेह न्यायाची मागणी करत होता. मात्र पोलिसांकडून कसलीच हालचाल झाली नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नाही की संशयितांना ताब्यात घेतले नाही. यामुळे या मागे कोणत्या राजकीय नेत्याचा हात होता का? तसा पोलिसांवर दबाव होता का असा सवाल आता ग्रामस्थ करत असून आक्रमक नातेवाइक आणि ग्रामस्थानी एकाचा चोप देत तर दूसऱ्याच्या मुस्क्या आवळत पोलिसांच्या स्वाधीन केले. अद्याप दोघे फरार आहेत. त्यांचाही अपेक्षित गतीने शोध घेतला जात नाही.

केळकर यांच्याकडून झाडाझडती

या प्रकरणी आता भाजपनेत्या नीता केळकर यांनी आटपाडी पोलिस ठाण्याच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली. पोलिस अधीक्षकांना तत्काळ फोन करून व्यक्तिशः लक्ष घालण्याची विनंती केली. तसेच पोलिस ठाण्याला भेट देऊन निरीक्षक विनय बहिर यांना तपासातील दिरंगाईबद्दल खडे बोल सुनावले. गेल्या काही दिवसांतील घटनांत आटपाडी पोलिसांवर तीव्र आक्षेप घेतला गेला आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे नातेवाइक, ग्रामस्थ व इतरांनी पोलिसांच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT