Neelam Gorhe-Basavaraj Bommai
Neelam Gorhe-Basavaraj Bommai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे : नीलम गोऱ्हेंनी साधला निशाणा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) निर्मितीला फार मोठा इतिहास आहे. बिदर-भालकी-बेळगावसह अन्य भाग महाराष्ट्राला जोडले गेले पाहिजे, ही आपली भूमिका आहे. पण, कर्नाटकचे (Karanatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे, ते अगदी हातपाय आपटत आहेत, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. (Nilam Gorhe criticizes Karnataka Chief Minister Basavraj Bommai)

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. दोन्ही राज्यातील नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगली जिल्ह्याच्या जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलोटवर दावा सांगितला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांकडून कर्नाटक सरकारला इशारे देण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे सोलापुरात बोलत होत्या.

विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या की, भाषावार प्रांतरचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली असली तरी चुकीचा अहवाल दिला गेला. बेळगावात मराठीचा अपमान होतो, तसा महाराष्ट्रात कानडीचा अपमान होत नाही. सामोपचाराचा ठेका केवळ महाराष्ट्रानेच घेतलेला नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत, त्याद्वारे न्याय संस्थेवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, असे वाटते. बोम्मई यांचे वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे आहे. ते अगदी हातपाय आपटत आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची देखील संयुक्त महाराष्ट्राची भूमिका होती. त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही तीच भूमिका घेतली होती. तरीही बोम्मई असं बोलत असतील, तर त्यामागे नक्कीच कोणीतरी आहे. महाराष्ट्राचा अभिमन्यू करण्याचा हेतू मराठीद्वेषी लोकांचा आहे, असं वाटतंय. आम्ही कानडी लोकांच्या विरोधात नाही. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे ही चौकी आमची, ती चौकी आमची अशा पद्धतीच्या विषारी भावनेतून जे वक्तव्य करत आहेत, ते निश्चित निषेधार्ह आहे. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून आळा घातला पाहिजे, अशी अपेक्षाही गोऱ्हे यांनी या वेळी बोलून दाखवली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्यावर भेटीवर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, रोहतगी भेट म्हणजे दबाव तंत्राचा भाग आहे. उगाच मराठी भाषकांना चौथाळायला लावायचं आणि केंद्राने सबुरीची भूमिका घ्यायची. का बोम्मई स्वतःसाठीच, स्वतःचा अजेंडा करत आहेत. बोम्मई- रोहितगी भेट ही स्ट्रॅटेजीपेक्षाही एक षडयंत्र आहे, असं वाटतंय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT