Ramraje Naik-Nimbalkar, Shashikat Shinde
Ramraje Naik-Nimbalkar, Shashikat Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Koregaon market committee : पक्षाअंतर्गत खो-खो, कबड्डीचा खेळ नको; रामराजे नाईक-निंबाळकर स्पष्टच बोलले

राजेंद्र वाघ

Koregaon news : सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या युतीकडे कार्यकर्ते कमी, पण भावनिक राजकारण करण्याची क्षमता आणि कला आहे. आपल्यातील दुही हीच त्यांची शक्ती झाली आहे. त्यामुळे कोरेगाव बाजार समितीची निवडणूक माझ्या दृष्टीने अग्निपरीक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपल्यामध्ये खो-खो, कबड्डीचा खेळ नको, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. त्यांच्या या आवाहानाला वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोरेगाव (Koregaon) तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या अंतर्गत गटबाजीचा संदर्भ होता.

कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक लागली आहे. यासंदर्भात कोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) बोलत होते.

रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, "सध्या पाय ओढण्याचे व जिरवाजिरवीचे राजकारण गावागावांत सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेत आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे. आपण आपल्यातीलच जिरवाजिरवीच्या राजकारणासाठी सुरू असलेला खो-खो, कबड्डीचा खेळ थांबविला पाहिजे. कारण या राजकारणामध्ये धोका अधिक आहे. माझ्यासह शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, नितीन पाटील, असे आम्ही सर्व जण एकत्रित आहोत. एकसंघपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ या."

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, "बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. कायदे बदलून या संस्थेचे अस्तित्व संपविण्याचा सध्याच्या सरकारचा डाव आहे. या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे गेल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी आहे. आम्ही चौघेजण एकत्र आहोत, आमच्यात बेबनाव नाही. पक्षाच्या विचारांसोबत सर्वांनी राहावे. महाविकास आघाडीतील काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाशी चर्चा करण्याचे आणि एकूणच या निवडणुकीसंदर्भातील सर्वाधिकार आपण रामराजे यांना देऊ."

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, "घेवड्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कोरेगाव बाजार समितीची ओळख आहे. या निवडणुकीला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाऊन या बाजार समितीमध्ये पुन्हा शरद पवार यांच्या विचारांची सत्ता आणूया."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT