Baliram Sathe-indrajeet Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Indrajeet Pawar : उत्तर सोलापूरला दुसऱ्यांदा झेडपीचे उपाध्यक्षपद; बळीराम साठेंनंतर इंद्रजीत पवारांना संधी

Solapur ZP Vice President Election : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी दीपक वैद्य यांची निवड होत बार्शीला पहिल्यांदाच संधी मिळाली. उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची निवड होऊन उत्तर सोलापूरचा दबदबा कायम राहिला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 March : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे बार्शी तालुक्यातील दीपक वैद्य, तर उपाध्यक्षपदी उत्तर सोलापूर तालुक्यातील इंद्रजीत पवार यांची निवड करण्यात आली आहे. वैद्य यांच्या निवडीने बार्शीला प्रथम जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. मात्र, उत्तर सोलापूर तालुक्यास इंद्रजीत पवार यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा उपाध्यक्षद मिळाले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत ज्या बळीराम साठे यांचा पराभव केला, त्याच साठेंनी भूषवलेले उपाध्यक्षपदही पवारांनी पटकावले.

दरम्यान, इंद्रजीत पवार (Indrajeet Pawar) हे सोलापूर जिल्हा परिषदेचे १९ वे उपाध्यक्ष ठरले आहेत. पहिले उपाध्यक्ष म्हणून शहाजीराव पाटील यांनी काम पाहिले होते, तर मंगळवेढ्याचे दिलीप चव्हाण हे १८ वे उपाध्यक्ष होते. त्यानंतर पवार हे १९ वे, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील दुसरे उपाध्यक्ष ठरले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ६८ पैकी ३८ जागा जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे भाजपचे पहिले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता जिल्ह्याला लागली होती.

अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होते, त्यामुळे बार्शीतून पक्षाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच सर्व जागा जिंकून देणारे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे समर्थक असलेले धनगर समाजाचे दीपक वैद्य यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या मार्डीच्या पवार घराण्याकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठे नेते बळीराम साठे यांचा पराभव करून निवडून आलेले इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्याला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

यापूर्वी बळीराम साठे यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. ते १९९७ ते १९९८ या कालावधीत उपाध्यक्ष होते. तसेच, साठे हे २००९ ते २०१२ या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षही होते. साठे यांच्यानंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डीचे इंद्रजीत पवार यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे.

विशेष म्हणजे इंद्रजीत पवार यांनी निवडणुकीत ज्या साठे यांचा पराभव केला, त्या साठे यांनीही प्रथम उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यामुळे साठेंनी काम केलेल्या जिल्हा परिषद उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT