

Daund, 18 March : दौंड तालुक्यातील खडकी-देऊळगावराजे गटातून तिसऱ्यांदा विजयी झालेले निष्ठावंत वीरधवल कृष्णराव जगदाळे यांना पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे. दोनदा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, एकदा आमदारकीची संधी आलेली असतानाही केवळ उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शब्दाखातर माघार घेणारे जगदाळे यांना अखेर निष्ठेचे फळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी दिली आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खडकी-देऊळगाव राजे गटातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा ४१५६ मतांच्या विक्रमी फरकाने पराभव करून वीरधवल जगदाळे हे तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तत्पूर्वी जगदाळे हे २००७ ते १०१२ आणि २०१७ ते २०२२ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे (Pune Zilla Parishad) सदस्य होते.
वीरधवल जगदाळे (Veerdhaval Jagdale) यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून राज्यभरात ओळखले जाते. त्यांना दोन वेळा पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी आली होती. परंतु पक्षाने थांबण्याची सूचना केल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ माघार घेतली होती. पक्षावर आणि नेतृत्वावर निष्ठा राखणाऱ्या जगदाळे यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संधी देत पक्षाने त्यांच्या निष्ठेचा सन्मान केल्याचे मानले जात आहे.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दौंडचे उमेदवार म्हणून वीरधवल जगदाळे यांना पक्षाचा एबी फॉर्मही दिला होता.एबी फॅार्म मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर त्यांनी मागचा-पुढचा कोणताही विचार न करता उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दोनदा आणि एकदा आमदारकीची संधी हुकली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने जगदाळे यांच्या पक्षनिष्ठेची कदर करत त्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या रूपाने महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली आहे.
दौंड तालुक्याला २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली आबणे यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षांनंतर जगदाळे यांच्या माध्यमातून दौंड तालुक्याला पुन्हा संधी मिळाली आहे.
जगदाळे यांना २०११ मध्ये पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांंनी अत्यंत विश्वासू असलेले जगदाळे यांना आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर या कारखान्याचीही संस्थापक संचालक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. दौंड गावचे पाटील असलेले वीरधवल जगदाळे हे सहकारी वाहतूक संस्था आणि पतसंस्थेचे पदाधिकारी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.