Solapur BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP : उमेदवारीसाठी शिफारस करणे अंगलट; भाजपच्या सोलापूर शहर उपाध्यक्षांसह चौघांना नोटीस

Assembly Election 2024 : माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या गोटातील भाजपचे सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीनिवास करली यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी शिफारस पक्षाकडे केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 September : दक्षिण सोलापूर मतदारसंघातून सोमनाथ वैद्य यांच्या उमेदवारीची शिफारस करणे भाजपचे सोलापूर शहर उपाध्यक्षांसह चार माजी नगरसेवकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. भाजपच्या वतीने या चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता या चौघांकडून काय उत्तर देण्यात येते, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने उमेदवारी मिळावी, यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्याकडे फिल्डिंग लावून प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः पक्षाच्या उमेदवारपासून इच्छुकांपर्यंत सर्वजण तिकिटासाठी तयारी करत आहेत.

सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून (South Solapur Constituency) विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी गेली सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे, त्यांनी भाजपकडेही उमेदवारीची मागणी केली असून तसा अर्जही त्यांनी भाजपचे (BJP) सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे उमेदवारी मागणीचा अर्जही दाखल केला आहे.

माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या गोटातील भाजपचे सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीनिवास करली यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी शिफारस पक्षाकडे केली आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून माजी सहकार मंत्री देशमुख गटाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवारी मिळावी, यासाठी सोमनाथ वैद्य यांनी सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे आपला उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जासोबत देशमुख गटाचे श्रीनिवास करली, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, लक्ष्मी पुरुड, राजश्री पाटील आणि जुगनबाई आंबेवाले यांचे शिफारस पत्र जोडण्यात आलेले होते.

सोमनाथ वैद्य हे भाजपचे प्राथमिक सदस्यही नाहीत, तरीही शहर उपाध्यक्ष असलेले करली यांनी वैद्य यांच्या उमेदवारीसाठी शिफारस केली आहे, त्यामुळे पक्षशिस्तीचे उल्लंघन झाल्याचे सांगून याबाबत तातडीने खुलासा करण्यात यावा; अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा या चौघांना नोटीसीद्वारे देण्यात आलेला आहे.

भाजपकडून देण्यात आलेल्या नोटिशीवर सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची सही नाही. मात्र, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड यांच्या सह्या आहेत. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरही आता दबक्या आवाजात सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

आगामी बैठकीत होणार निर्णय

सोलापूरचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी यासंदर्भात सांगितले की, सोमनाथ वैद्य उमेदवारीसाठी शिफारस पत्र देणाऱ्या माजी नगरसेवकांवर कारवाई करण्यचा विषय नुकतेच चर्चेत आला होता. पक्षाच्या आगामी बैठकीत त्यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT