Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आता लाडके झालेल्या नीलेश लंकेना राष्ट्रवादीत घ्यायला विरोध होता

नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांना शिवसेनेतून ( Shivsena ) काढल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढविली.

Amit Awari

अहमदनगर - पारनेर तालुका हा डाव्या विचारांचा आणि संयमी राजकारण करणाऱ्यांचा तालुका समजला जात होता. नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांना शिवसेनेतून ( Shivsena ) काढल्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP ) प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढविली आणि शिवसेनेचे आमदार विजय औटी ( Vijay Auti ) यांचा पराभव केला. मात्र नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सहजा सहजी झाला नाही. Now the beloved Nilesh Lanke was opposed to the NCP

नीलेश लंके तसे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भक्त. त्यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून तालुकाध्यक्षा पर्यंतचा राजकीय प्रवास केला होता. मात्र विजय औटी यांच्या बरोबर वैचारिक संघर्ष तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेक प्रकरणात नीलेश लंकेंवर आरोप झाल्याने शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून बाहेर काढले. लंकेंनी समर्थकांची बैठक घेतली. या बैठकीला सभेचे रुप आले होते. यातून ते कोणत्यातरी पक्षात प्रवेश करत विधानसभेची निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले होते. मात्र हा पक्ष प्रवेश म्हणावा एवढा सोपा नव्हता.

भाजप व शिवसेनेची त्यावेळी युती होती. शिवसेनेकडे विजय औटींसारखे दिग्गज व अभ्यासू नेतृत्त्व होते. त्यामुळे पारनेर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेना राखणार हे स्पष्ट होते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. यात पारनेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार हे स्पष्ट होते. यातच राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पारनेरची काँग्रेस दुबळी झाली होती. विधानसभा निवडणूक लढवायची तर राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा पर्याय होता.

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे माजी आमदार दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, सबाजीराव गायकवाड, दीपक पवार, मधुकर उचाळे आदी महत्त्वाचे नेते होते. यातील काहींचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींचा नीलेश लंके यांच्या नावाला विरोध होता. नीलेश लंके हे शिवसेनेच्या विचारांचे आहेत व राष्ट्रवादीकडे सक्षम नेतेही आहेत. अशा स्थितीत लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊ नये असे राष्ट्रवादीच्या गोटातील वातावरण होते.

शिवसेना तर सुटली पण राष्ट्रवादीही स्वीकारेना अशा स्थितीत लंके पोचले होते. अशा वेळी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके. त्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा बारीक अभ्यास केला होता. सर्वसामान्य जनतेची नस त्यांनी बरोबर ओळखली होती. नीलेश लंके राष्ट्रवादीत आले तर राष्ट्रवादीची ताकद वाढेल हे त्यांनी ओळखल होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरमध्ये केवळ दिवंगत ज्येष्ठ नेते वसंतराव झावरे यांनाच आमदार होता आले होते. त्यातील एकदा तर त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती. विजय औटींनी पारनेर मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. नीलेश लंकेंचा एक चाहता वर्ग होता. ही बाब लक्षात घेऊन राजेंद्र फाळकेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांना पारनेरची स्थिती समजावून सांगितली. पारनेर तालुक्यातील घटनाक्रम सांगितला. लंकेंना तिकीट मिळाल्यास राष्ट्रवादीची पारनेर तालुक्यात ताकद कशी वाढेल हे सांगत लंकेंना उमेदवारी देण्याची गळ घातली. अखेर फाळकेंच्या प्रयत्नांना यश आले.

लंके यांनी 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत जिल्ह्यातील सर्वाधिक मतांनी विजयी होणारे आमदार झाले. कोरोना संकट काळात त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली आहे. पारनेर नगर पंचायतीवरही नीलेश लंकेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. म्हणून लंके नेहमीच फाळकेमुळे मी आमदार झालो असे जाहीरपणे सांगतात. मात्र नीलेश लंके यांचे मार्गदर्शक असलेले राजेंद्र फाळके सावकाश व संयमी खेळी करत जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढवित आहेत.

फाळकेंची दोन गणित चुकली

अहमदनगर जिल्ह्यात कधी नव्हे एवढे यश फाळके यांच्या कारकिर्दीत मिळालं. विधानसभेचे सहा आमदार, विधान परिषदेचे एक आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले. मात्र फाळकेचे विधानसभा निवडणुकीतील दोन गणिते चुकली. शेवगाव-पाथर्डी मतदार संघात प्रताप ढाकणे व श्रीगोंदे मतदार संघात घनश्याम शेलार यांना पराभव पत्करावा लागला. यातील घनश्याम शेलार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT