Jaysiddheshwar Mahaswami
Jaysiddheshwar Mahaswami Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : भाजप खासदाराच्या बनावट जातप्रमाणपत्राची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची मंत्रालयात बदली

तात्या लांडगे

Solapur News : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा तपास करणाऱ्या सोलापूर जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणात सूळ यांनी दक्षता पथकाला खासदार महास्वामी यांच्या मूळ गावापर्यंत चौकशीसाठी पाठवले होते. या प्रकरणात तपास अधिकारी सूळ यांची निर्णायक भूमिका असताना त्यांचीच बदली करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Officer who investigated BJP MP's fake caste certificate has been transferred to the ministry)

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर सोलापुरातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याचा तपास सोलापूर जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांच्याकडे होता. या प्रकरणात सूळ यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. खासदार महास्वामी यांच्या मूळगावापर्यंत दक्षता समितीला सूळ यांनी पाठवले होते. पथकाने त्या ठिकाणी जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली होती, त्यानंतर खासदारांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता.

सोलापूरच्या जात प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव सूळ यांच्या निकालावर खासदार महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरचौकशी करण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तीन सुनावण्या झाल्या आहेत. मागील सुनावणीत खासदारांनी सात वकिलांची फौज पडताळणी समितीकडे पाठवून आपले म्हणणे मांडले होते. त्या वेळी महास्वामी यांच्या विजयामुळे तक्रारदारांपैकी एकाच्या हक्कावर गदा आलेली नाही. मात्र, समितीने नियमावर बोट ठेवत तक्रारदार असू द्या किंवा नसू द्या. या संशयास्पद प्रकरणात समिती स्वतः चौकशी करू शकते, असे वकिलांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते.

दरम्यान, या प्रकरणात समितीच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून फेरकार्यवाही सुरू केली होती. त्याचदरम्यान त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी ३० ऑगस्ट रोजी संपणार असल्याने आपल्याला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी सूळ यांनी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाकडे केली होती. मात्र, त्यांची मागणी विचारात न घेता ३१ ऑगस्ट रोजी स्वतंत्र आदेश काढून त्यांना सामान्य प्रशासन विभागात रुजू होण्याचा आदेश दिला आहे.

बी. जी. पवारांकडे सोलापूरचा तात्पुरता पदभार

ज्ञानदेव सूळ यांना मंत्रालयात पुन्हा रुजू होण्याचे आदेश आल्याने सोलापूर जात प्रमाणपत पडताळणी समितीचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. मात्र, नवा अध्यक्ष नेमण्यात येईपर्यंत धाराशिव समितीचे अध्यक्ष बी. जी. पवार यांच्याकडे सोलापूरचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आलेला आहे, असे आदेशात म्हटलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT