Sangola News : ‘मी सध्या आमदार आहेच. पण, माझ्याबरोबर दीपक (आबा) साळुंके हेही आमदार असतील. येणाऱ्या पाच वर्षांत आबा आमदार झाले नाहीतर, मी बाजूला होईन. पण आबाला आमदार करेन,’ अशी घोषणा सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. शहाजीबापू पाटील यांच्या या वक्तव्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Once I'll sit aside; But I will make Deepak Salunkhe an MLA : Shahaji Patil)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांच्या समोर शहाजीबापू पाटील यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत सांगोल्यातून कोण आमदार होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, आमदार शहाजी पाटील व दीपक साळुंखे यांच्या विधानसभेच्या जागेवरून मतभेद असल्याची चर्चा होती. त्यामुळे साळुंखे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शहाजीबापू काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, मागच्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी शहाजी पाटील यांना मदत केली होती. त्या वेळी साळुंखे यांच्या मदतीची परतफेड करेन, असे पाटील यांनी म्हटले होते. त्यामुळे या वेळी शहाजी पाटील की साळुंखे विधानसभा लढविणार, अशी चर्चा आता होत आहे.
डॉक्टरांनी मला सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यामुळे मी सध्या बाहेर फिरत नाही. पण, दीपक साळुंखे यांच्या कार्यक्रमाला आलो नसतो तर साळुंखे कुटुंबाला काहीही वाटलं नसतं. पण, तुम्ही (पत्रकार) लय कालवा केला असता, म्हणून मी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो. माझी आणि दीपकआबांची मैत्री ही आजकालची नसून शिवाजी विद्यापीठाच्या राजकारणात आम्ही अकरा वर्षे एकत्रित घालविली आहेत. आमचा पक्ष, पार्ट्या वेगळ्या असल्या तरी व्यक्तिगत जिव्हाळा कायम आहे, असे शहाजी पाटील यांनी नमूद केले.
आमदार पाटील म्हणाले की, सतेशिवाय विकास नाही. दुष्काळी तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सत्ता ही हवीच असते. आमच्या सत्तेच्या काळात सध्या झालेले परिवर्तन आपण याही डोळा पाहत आहात. त्यामुळे येणाऱ्या काळातही तालुक्याचा सत्तेतून विकास करायचा, हे आम्ही दोघांनीही ठरवले आहे.
कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, कल्याणराव काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, समाधान काळे, पी. सी. झपके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.