Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पालखी महामार्ग : गडकरींच्या ‘स्पीड’ला सोलापूर जिल्ह्यात ‘ब्रेक’ लावण्याचं काम कोण करतयं ?

सरकारनामा ब्यूरो

शशिकांत कडबाने : सरकारनामा ब्यूरो

अकलूज : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे स्वप्न असलेल्या पालखी महामार्गाचे काम सोलापूर जिल्ह्यात मोठ्या गतीने सुरू आहे. मात्र, बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सरकारी यंत्रणेकडून वेळ लागत असल्याने बाधीत शेतकरी नाराज असून या शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडल्यास कोण जबाबदार असा प्रश्‍न विचारण्यात येऊ लागला आहे.

जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते तोंडले या भागातील रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या भागातील अनेक शेतकऱ्यांना रस्त्यात गेलेल्या जमीनीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत.या बाधित शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjeetsinh Mohite-Patil) यांनी अकलूज येथील त्यांच्या ‘शिवरत्न’ बंगल्यावर आज बैठक घेतली. बैठकीत नाराज शेतकऱ्यांची समजूत काढत सरकारी दरबारी पाठपुरावा करून नुकसान भरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आमदार मोहिते-पाटील यांनी बैठकीत सांगितले.

पालखी महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांना पंचनाम्याचा, भरपाईचा अहवाल देताना प्रत्येक खाते एकमेकांकडे बोट दाखवत शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून विविध सरकारी कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत.रस्ता रुंदीकरणासाठी अधिगृहीत जमिनींच्या पंचनाम्यांमध्ये कोणाची विहीर,पाईपलाइन,बोअर, घराचे बांधकाम, फळबागा अशांच्या नोंदीच घेण्यात आल्या नाहीत. तर २५/४ ते तोंडले याभागातील सुमारे दीड हजार पंचनामे झाले नाहीत, अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.अशा अनेक अडचणींमुळे शेतकरी चिडून कामे अडवत आहेत.

महसूल, भूमापन यांच्यामुळे सर्व कामे खोळांबली असल्याने आमदार मोहीते पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर विनाकारण रस्त्याची कामे अडवून लोकांना नाहक त्रास देणाऱ्या शेतकऱ्यांना धैर्यशील मोहीते पाटील यांनी खडसावले. पालखी मार्गात येणाऱ्या सर्व पुलांची कामे पावसाळ्यापूर्वी उरकावीत, अशा सूचना आमदार मोहिते पाटील यांनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या पाइपलाइन बाधित झाल्या आहेत अशांना तातडीने पाइपलाइन दुरुस्त करुन द्याव्यात. जेणेकरुन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळू शकेल.छोट्या फाट्यांकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आसल्याची तक्रार ऍड. प्रकाश पाटील व प्रताप पाटील यांनी केली. तोंडले येथील स्मशानभूमी रस्त्याच्या कामात पाडण्यात आली आहे. ती तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

या बैठकीस भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, तहसीलदार जगदीश निंबाळकर, नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता इंद्रकुमार नारायणकर, जलसंपदा विभागाचे अमोल मसकर तसेच इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT