पश्चिम महाराष्ट्र

Pankaja Munde : पंकजा मुंडे कोल्हापूर दौऱ्यावर जाणार! राजू शेट्टींचे प्रशासन अन् लोकप्रतिनिधींनीवर गंभीर आरोप; पंचगंगा प्रदुषणाचा लावणार सोक्षमोक्ष

पंचगंगा प्रदूषण प्रकल्प रखडल्याचा आरोप करत राजू शेट्टींनी टक्केवारीच्या खेळावर निशाणा साधला. पंकजा मुंडे १५ दिवसांत प्रकल्पाची पाहणी करणार आहेत.

Rahul Gadkar

पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात मुंबईत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील प्रदूषणाची भीषण वास्तवता मांडत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दांत प्रहार केला. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या 'टक्केवारी'मुळेच जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण प्रकल्प रखडल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. यावेळी आमदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील सीईटीपी (CETP) आणि झेडएलडी (ZLD) प्रकल्प केवळ लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या टक्केवारीच्या राजकारणामुळे रखडले आहेत. इचलकरंजी प्रकल्पाची वर्क ऑर्डर होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी प्रत्यक्षात केवळ ५ टक्केच काम झाले आहे. अधिकारी आणि प्रशासनाच्या केवळ कागदोपत्री भूमिकेमुळे आणि दिरंगाईमुळे प्रकल्प सुरू होण्यात अडचणी येत आहेत. या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.

कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही मोठ्या महानगरपालिकांमधून प्रक्रिया न केलेले दूषित आणि सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडले जात आहे. ग्रामीण भागातील ८९ गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनाचा २०७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, या कामांना निधी मंजूर न झाल्याने ही फाईल मंत्रालयात धूळ खात पडली आहे.

इचलकरंजी शहरातील सीईटीपी प्रकल्प चालवण्यासाठी येणारा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प बंद ठेवून, कंपन्यांचे दूषित रासायनिक पाणी रात्रीच्या अंधारात थेट नदीत सोडले जात आहे.नोव्हेंबर महिन्यापासून ते पावसाळा सुरू होईपर्यंत पंचगंगा नदीकाठच्या गावातील शेतीला पाटबंधारे विभागाकडून दूषित पाणीपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना सक्तीने हेच दूषित पाणी पिकांसाठी वापरावे लागते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आकारलेला 'उपसा सिंचन कर' पूर्णपणे माफ करण्यात यावा, अशी आग्रही मागणी शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला तात्काळ चौकशीचे आदेश दिले. तसेच, येत्या १५ दिवसांत आपण स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन, या संपूर्ण परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेणार असल्याचे जाहीर केले.पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न आता अत्यंत गंभीर बनला असून, पर्यावरण मंत्र्यांच्या या दौऱ्यानंतर रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार का आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बैठकीला पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्मिन, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड तसेच कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त आणि पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT