Pandharpur, 10 September : पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी प्रस्तावित कॉरिडॉरच्या कामाला विरोध करून विषय स्थगित केलेला असतानाच, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपूरमध्ये कॉरिडॉरचे काम पूर्ण केले जाईल, अशी सूचक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे, त्यामुळे सरकार कॉरिडॉर पूर्ण करण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. मंत्री गोरेंच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉरिडॉरबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे कॉरिडॉरविरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री गोरेंच्या या भूमिकेवर कॉरिडॉरविरोधकांची प्रतिक्रिया काय येते, हे पाहावे लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरसाठी राज्य सरकारने अलीकडेच सुमारे 4000 कोटी रुपयांचा भव्य विकास आराखडा मंजूर केला आहे. त्या दृष्टीने शासन पातळीवर कामाला वेग आला असून, येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
पंढरपूर नगरपालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत धक्कादायक प्रकार घडला. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी कॉरिडॉरच्या मंजुरीच्या विषयाला तीव्र विरोध करत तो विषय स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थानिक पातळीवरच खीळ बसली होती.
या घटनेनंतर तत्काळ पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, विरोध काहीही असला तरी कॉरिडॉरचे काम कोणत्याही परिस्थितीत होणारच, असे ठणकावून सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आता प्रशासन विरुद्ध नगरपालिका असा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! पंढरपूर हे कोट्यवधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. या पवित्र भूमीचा विकास करताना वारकरी परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचा गाभा जपत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ₹४,१५०.४६ कोटींचा सर्वसमावेशक पंढरपूर कॉरिडॉर विकास आराखडा साकारला जात आहे.
कॉरिडॉरच्या आराखड्यांतर्गत आधुनिक पायाभूत सुविधा, स्कायवॉक, चंद्रभागा घाटांचा विकास, वारकऱ्यांसाठी अधिक दर्जेदार सुविधा आणि तीर्थक्षेत्राचे नियोजनबद्ध सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे.
हा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, पर्यटनाला बळकटी देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हे देखील या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. श्रद्धेचा सन्मान, परंपरेचे जतन आणि विकासाची नवी दिशा यांचा समतोल साधत पंढरपूरला जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.