

अहिल्यानगर : नाशिक कुंभमेळ्याच्या काही कामांसाठी कथित बनावट निविदा काढल्याचे प्रकरण चर्चेत असतानाच आता शासनाच्या आर्थिक प्रणालीच्या सोर्स कोड चोरीप्रकरणी झालेल्या या कारवाईने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे..
महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभाग आणि नगरविकास विभागाच्या मुख्य आर्थिक प्रणालीचा सोर्स कोड चोरल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सॉफ्टमेट कंपनीचा मालक मंदार प्रदीप पाथरीकर याला दुबईहून पुणे विमानतळावर आल्यानंतर पोलिसांनी अटक केली.
अहिल्यानगर तसेच पुण्यातील नामांकित PRM Software Solution Limited या आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याचा आरोप या प्रकरणातील आरोपींवर आहे. याप्रकरणी अहिल्यानगरच्या सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनीचा मालक मंदार पाथरीकर, PRM कंपनीचे माजी कर्मचारी आणि अन्य आरोपी अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मंदार पाथरीकर फरार होता. त्याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर तो दुबईला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पाथरीकरविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. दुबईहून तो पुणे विमानतळावर परतल्यानंतर अहिल्यानगर सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार असून सायबर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, सोर्स कोड चोरीमागील नेमका उद्देश काय होता, चोरी करण्यात आलेल्या डेटाचा वापर कुठे आणि कशासाठी करण्यात आला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सोर्स कोड चोरीच्या या प्रकरणाची व्याप्ती आणि त्यामागील नेमका कट तपासातून समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.