Panhala land transfer case : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बुधवार पेठ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. शिवाय त्यांना पुढील 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यासही बंदी घातली आहे. ग्रामसेवक अमर धुमाळे यांनाही निलंबित केले आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ही कारवाई केली आहे.
गावातील पडीक जमीन समजून साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र करून 14 जणांची नावे बुधवार पेठ येथील जमीन गट क्रमांक 616 लावण्यात आले होते. त्याबाबत जमिनीचा फेरफार केल्याबद्दल अमरसिंह विजयसिंह निकम यांनी तक्रार दिली होती. तर वैष्णवी विजय महाजन यांनीही अशाच प्रकारच्या दुसऱ्या जागेच्या फेरफारसंदर्भात तक्रार नोंदविली होती.
ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी निकम आणि महाजन यांची तक्रार दिशाभूल करणारी असल्याचे म्हंटले होते. अखेर चौकशीनंतर विभागीय आयुक्तांनी बुधवार पेठ ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्यांना 6 वर्षांसाठी अपात्र केले असून आदेशाच्या दिनांकापासून पुढील 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक लढण्यासही बंदी घातली आहे. ग्रामसेवक अमर धुमाळे यांनाही निलंबित केले आहे.
विद्यमान सरपंच अनुजा सुधीर लोहार, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य पुष्पा विलास कदम, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य प्रतिभा राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य शरद रामचंद्र मिरजे, सदस्य जमीर चाँदसो अत्तार, उपसरपंच जितेंद्र गोपीचंद चव्हाण, सदस्य मीना सरदार सोरटे यांच्यावर ही कारवाई झाली आहे. तसेच ग्रामसेवक अमर धुमाळे यालाही तत्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश झाले आहेत.
ग्रामपंचायत सदस्यांविरुद्ध एकूण दोन तक्रार अर्ज होते. यात अमरसिंह निकम यांच्या चौकशीत 5 सदस्यांना अपात्र ठरविले व दोघांना त्यातून मुक्त केले; परंतु महाजन यांनी केलेली तक्रार व त्या अनुषंगाने ग्रामपंचायत कायदा कलम 39/1 प्रमाणे जी चौकशी सुरू होती, त्यामध्ये सर्वांना दोषी धरले. दोन्ही चौकशींमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना उर्वरित कालावधीसाठी पदच्युत करून पुढील सहा वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढविण्यासाठी प्रतिबंधित केले आहे.
कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर ग्रामसेवक अमर धुमाळे यांचा निष्काळजीपणा व वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे या कारणांमुळे तत्काळ निलंबित करण्यात यावे व त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी नेमण्याचे आदेशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.