Solapur News : सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचा ठराव करून जिह्यात काँग्रेस सध्या पक्षबांधणी करण्यासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने पदाधिकारी निवडीतून जातीय समतोल राखत प्रशांत साळे, अॅड. रविकरण कोळेकर, मनोज माळी यांची निवड केली केली आहे.
काँग्रेसचा 2014 आणि 2019 असा सलग दोन वेळा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यातच काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आवाजही उठवल्याचे दिसून आलेले नाही. अशा परिस्थितीत 2024 ची लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेतृत्वाने प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या काँग्रेसला हे युवा नेते कशा पद्धतीने बाहेर काढतात, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (Latest Political News)
सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंढरपूर, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, अक्कलकोट या ठिकाणी भाजप आमदार असून मोहोळ व शहर मध्य येथे राष्ट्रवादी व काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे आजमितीला भाजप सोलापूर लोकसभेसाठी मजबूत स्थिती आहे. भाजप विद्यमान खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांना पर्यायी उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
भाजपच्या रणनीतीला तोड देण्यासाठी काँग्रेसनेही दांडगा जनसंपर्क आणि लोकांमध्ये मतावर प्रभाव पाडू शकेल असा चेहरा देण्यात दृष्टीने आमदार प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्याचा ठराव केला. त्याच अनुषंगाने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून मागील निवडणुकीप्रमाणे मिळालेले मताधिक्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने बांधणी सुरू केली आहे.
जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी दक्षिण भागातील प्रशांत साळे या नवोदित युवकाला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. तालुक्यामध्ये धनगर समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा फायदा होण्याच्या दृष्टीने अॅड. रविकरण कोळेकर यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय मनोज माळी या कार्यकर्त्याला शहराध्यक्षाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या दिमतीला अॅड. नंदकुमार पवार, शिवाजीराव काळुंगे, मारुती वाकडे, पांडुरंग जावळे, विष्णु शिंदे, राजाराम सूर्यवंशी, राजेंद्र चेळेकर आदी पदाधिकारी आहेत.
गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाला स्वतःचे कार्यालय नव्हते, मात्र प्रशांत साळे यांनी तालुक्यातील गर्दीच्या ठिकाणी कार्यालयाची सुरूवात केली आहे. त्या ठिकाणी तालुक्याच्या प्रश्नावर, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसने पंढरपूर-विजयपूर या रेल्वे व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेलाही प्रशासकीय मान्यता 2014च्या साली दिली. मात्र दोन्ही प्रश्न गेली दहा वर्षे राजकीय व्यासपीठावर धूळ खात पडले आहेत. आता या प्रश्नांवर काँग्रेस कसा लढा उभारणार त्यावर पक्षाचे मताधिक्य अवलंबून आहे.
लोकसभा 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी पंढरपूर व मंगळवेढ्यातून दिवंगत आमदार भारत भालकेंनी मताधिक्य दिले होते. आता काँग्रेसला मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. सध्या बीआरएसने सोलापूरात दमदार एन्ट्री केल्याचे दिसून येत आहे. यावर नवे पदाधिकारी कशा पद्धतीने मार्ग काढून काँग्रेसला विजय मिळवून देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.