Karhad north assembly  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Manoj Ghorpade: चोरे विभागाचे पाण्याचे स्वप्न पूर्ण करणार

Manoj Ghorpade: महायुतीच्‍या प्रचारार्थ कार्यकर्त्यांची रॅली, विविध गावांमध्‍येही भेटीगाठी

सरकारनामा ब्यूरो

Manoj Ghorpade : चोरे विभागातील इंच न इंच क्षेत्र पाण्याखाली आणण्याचे स्वप्न लोकनेते बाबासाहेब चोरेकरांनी पाहिले होते; परंतु येथील विद्यमान आमदारांना ते जमले नाही. त्‍यांनी जाणीवपूर्वक चोरेकरांचा भाग विकासापासून वंचित ठेवला.

मात्र, आता वेळ बदलली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागाच्या सिंचनाचा प्रश्न सोडवण्याचा शब्द दिला आहे आणि भाजप महायुतीच आपल्या भागाला पाणी देऊन दुष्काळमुक्त करेल, अशी ग्‍वाही महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दिली.

चोरे (ता. कऱ्हाड) येथे श्री. घोरपडे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्‍या वेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, भय्यासाहेब साळुंखे, निखिल साळुंखे पाटील, धैर्यशील साळुंखे-पाटील, संजय गोळे, संजय साळुंखे, श्री. भांबे, संदीप काटे, महेश काटे, शरद भोसले, अक्षय यादव, मुकुंद गोळे, जालिंदर रामुगडे, विजय चव्हाण, अगंद साळुंखे, विकास साळुंखे, दीपक साळुंखे, बबन यादव, राजेंद्र साळुंखे, नरेंद्र यादव, नारायण कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, दिगंबर भिसे पाटील, माजी सरपंच रणजित कदम, जयवंत जाधव यांची विशेष उपस्‍थिती होती.

घोरपडे म्हणाले, ‘‘चोरे विभाग पाण्यासाठी तहानलेला आहे. आम्‍ही पाणी संघर्ष समितीच्‍या पाठीशी आहोत. आपला प्रस्ताव मंत्रालयात आहे. नुकताच प्रचाराचा नारळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाल येथे फोडला. त्या वेळी त्यांनी ५० मीटरचे हेड १०० हेडपर्यंत नेण्याचा शब्द दिला असल्‍याने, कॅबिनेटच्या दोन बैठकीतच हा प्रश्न मार्गी लावू. इतर विकासकामांतही महायुती कमी पडणार नाही.’’

एम टॅंक क्षेत्रात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्‍यामुळे बदलाच्या प्रवाहात सर्वांना बरोबर घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.

भय्यासाहेब साळुंखे म्हणाले, ‘‘मनोज घोरपडे हे गतिमान, क्रियाशील नेतृत्व आहे. चोरे विभागातून मनोज घोरपडे यांना येथील जनता मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देणार आहे.’’ या वेळी संजय साळुंखे यांचेही भाषण झाले.

बाळासाहेब चोरेकर यांनी श्री. घोरपडे यांना शुभेच्छा दिल्‍या. या वेळी सरपंच अंकुश सप्रे, रामदास बाबर, जगन्नाथ पाटील, रामचंद्र पाटील, प्रशांत सप्रे, संदीप काटे, रणजित कदम, शंकरराव शेजवळ, सूर्यकांत पडवळ, राज सोनवणे, विश्वास काळभोर, राहुल पाटील, लालासाहेब गिरीगोसावी, अमोल थोरात, प्रांजल जाधव, पालचे सरपंच धनंजय घाडगे, ओंकार पाटील, नीलेश शिरसट आदी उपस्‍थित होते.

मतदारांशी संवाद

गावभेट दौऱ्यानिमित्त खोडद, हरपळवाडी, भगतवाडी, मरळी, डफळवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, साखरवाडी, जंगलवाडी, धावरवाडी, सावरघर या गावांमध्येही श्री. घोरपडे यांनी मतदारांशी संवाद साधला. या वेळी सावरघर येथे प्रवेशद्वारावर रांगोळीत कमळ चिन्ह रेखाटून, तसेच संपूर्ण गावात रांगोळीचा सडा टाकून लाडक्या बहिणींनी त्‍यांचे औक्षण केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT