Ganesh Wagh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

One Crore Bribe News : एक कोटी लाच प्रकरण; 'गणेश वाघ'ला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Pradeep Pendhare

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ याच्या अटकेनंतर लाचेच्या एक कोटी रुपयांच्या तपासाला वेग आला आहे. गणेश वाघ याला आज लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील वाघ याचा सहकारी सहायक अभियंता अमित गायकवाड याला दोन दिवसांच्या कोठडीनंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

गणेश वाघ याला अटक केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाचे पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपुत आणि नगर कार्यालयातील सहायक निरीक्षक शरद गोरडे यांनी त्याला नगरच्या न्यायालयात आणले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांच्यासमोर गणेश वाघ याला हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील अनिल घोडके यांनी सरकारतर्फे युक्तिवाद केला. लाचेचा प्रकार तीन नोव्हेंबरला घडला असून, तेव्हापासून गणेश वाघ हा पसार होता. या काळात तो कोठे होता. त्याला कोणी मदत केली. मोबाईल जप्त करायचा आहे. बेहिशेबी मालमत्ता आहे का? , याचीदेखील चौकशी करणार आहेत. हस्ताक्षर आणि आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. यामुळे गणेश वाघ याच्याकडे चौकशीसाठी कोठडी गरजेची आहे. जिल्हा न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवादानंतर गणेश वाघ याला 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गणेश वाघला अशी केली अटक

गणेश वाघ हा लाचेच्या कार्यवाहीच्या 3 नोव्हेंबरच्या दिवसापासून पसार होता. त्याच्या शोधासाठी पथक राज्यभर कार्यरत होते. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा या ठिकाणी पथकाने त्याच्या शोधासाठी छापे घातले. दिवाळीनिमित्ताने गणेश वाघ हा मुंबईहून धुळ्याला येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावला आणि गणेश वाघ याला नाशिकजवळ ताब्यात घेतले. गुन्ह्यातील लाचेची रक्कम मोठी असल्याने त्याची तीव्रता खूप मोठी आहे. यामुळे या गुन्ह्यातील वाघ याचा सहकारी सहायक अभियंता अमित गायकवाड याला नगर जिल्हा न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले आहे. या अपिलावर अजून न्यायालयाकडून तारीख मिळालेली नाही.

SCROLL FOR NEXT