MP Ranjitsinha Naik Nimbalkar News
MP Ranjitsinha Naik Nimbalkar News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मी कच्चा खेळाडू नाही; सर्वांना पुरून उरणारा आहे : खासदार निंबाळकरांचा इशारा

किरण बोळे

फलटण : ''सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे सरकार मला व आमदार जयकुमार गोरे यांना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, रणजितसिंह नाईक-निंबाळकर हा काही कच्चा खेळाडू नसून तोही या सर्वांना पुरून उरणारा आहे,'' असा इशारा माढाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला आहे. (Ranjitsinh Naik Nimbalkar News)

'शायनिंग महाराष्ट्र' या कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वराज फाऊंडेशन व सांसा फाऊंडेशन आयोजित 'शायनिंग महाराष्ट्र' या प्रदर्शनाचा समारोप केंद्रीय संचार, राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळूंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्या ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर, पुणे रिजनच्या जनरल पोस्ट मास्तर मधुमिता दास, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सांसा फाऊंडेशन व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

केंद्र शासनानं जनतेच्या हितासाठी कोणकोणत्या योजना जनतेसाठी अंमलात आणल्या आहेत, याची माहिती हजारो लोकांनी 'शायनिंग महाराष्ट्र' या प्रदर्शनाद्वारे घेतली आहे. त्याचा लाभही त्यांना निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करुन मंत्री चौहान म्हणाले, ''खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचं काम आदर्शवत असून त्यांची प्रेरणा घेत अन्य खासदारांनी काम करायला हवं. फलटण इथं पासपोर्टचे ऑफिस व्हावं, अशी खासदार निंबाळकर यांची सातत्याची मागणी आहे. त्यानुसार फलटण येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टची सुविधा लवकरच उपलब्ध दिली जाईल. कार्यक्रमाचं प्रास्तविक जयकुमार शिंदे यांनी केलं. सूत्रसंचालन प्रा. सतीश जंगम यांनी केलं, तर अनुप शहा यांनी आभार मानले.

त्या आंडू-पांडूंनी माझा नाद करु नये...

बारामतीला वळविलेलं पाणी अडवायचं धाडस आम्ही केले. त्यामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. आपण कदापि मागं हटणार नाही. आपण शरद पवार व श्रीमंत रामराजे यांच्यापुढं हार मानली नाही, तर त्या आंडू-पांडूसमोर मी हार मानणार नाहीय. त्यांनी माझा नादपण करु नये, असा इशारा खासदार निंबाळकरांनी विरोधकांना दिला.

सातशे कोटी म्हणजे सातावर किती शून्य....

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्याशी जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात चर्चा केली होती. त्यानुसार पंतप्रधानांनी दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पात जिहे-कटापूर योजनेसाठी सातशे कोटी रुपयांची तरतूद केली. सातशे कोटींचा निधी म्हणजे सातावर किती शून्य हे रामराजेंना विचारा, असा टोमणा आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT