Karad Nagar Palika Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : 'पवारांची राष्ट्रवादी शिंदेसेनेच्या नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीचाच गेम करतेय'

Karad Municipal Council News : कऱ्हाड नगरपालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगवाकर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षांच्या माध्यमातून महायुतीविरोधात राजकारण केल्याचा आरोप केला.

सचिन शिंदे

Karad, 08 August : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकशाही आघाडी कऱ्हाडच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीलाच गोळ्या घालत आहे. महायुतीचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची कामे अडवत आहे, असा घणाघाती आरोप नगरपालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगवाकर यांनी केला.

कऱ्हाड नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने पत्रकार परिषद घेतली. पालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्येच एकमत नाही, अशी स्थिती आहे, असे सांगून वाटेगावकर म्हणाले, पालिकेत महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे नगराध्यक्ष आहेत.

मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकशाही आघाडी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षातील नगराध्यक्ष त्यांच्याच महायुतीलाच गोळ्या घालत आहे. ती बंदूक राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि खांदा महायुतीच्या घटकपक्षाच्या नगराध्यक्षांचा आहे, ते विसरता कामा नये. सत्ताधाऱ्यांनीच गोंधळ घालयचा आणि त्याच खापर मात्र आमच्यावर फोडायचे, असेच सुरू आहे.

एकमोकांविरोधात निवडणूक लढवताना महायुतीचा साक्षात्कार झाला नव्हता काय?, यावर वाटेगावकर म्हणाले, तो प्रयत्न झाला होता. मात्र, नगराध्यक्षपदावरून बिनसले, त्यामुळे सध्या पालिकेत सत्ताधारी स्वतःचे अपयश लपविण्यासाठी विरोधकांवर खापर फोडत आहेत. सभागृहात गोंधळ झाला. त्याला सत्ताधारीच जबाबदार आहेत. पालिकेत नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला जात असताना त्यांना जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही. त्यांनी बैठकीला येतानाच ठरवून विषय हाणून पाडण्याचे ठरवत आक्रमक भूमिका घेतली होती.

नगरपालिकेने निवडणुकीनंतर अत्यंत कमी सभा घेतल्या आहेत, असा आरोप करून वाटेगावकर म्हणाले, अन्य पालिकांत सहा ते सात सभा आणि स्थायी समितीच्या बैठकाही झाल्या. मात्र, कऱ्हाडला अवघ्या दोनच सभा घेतल्या आहेत. त्यात एका सभेत तब्बल १५७ विषय, तर दुसऱ्या सभेत ६५ विषय होते. त्याच्या पोटात ३५० उपविषय ठेवले. इतक्या मोठ्या प्रमाणात विषय असूनही नगरसेवकांना वेळेत अहवाल दिले गेले नाहीत.

अभ्यासासाठी आवश्यक कागदपत्रे सभेच्या आदल्या दिवशी दिली जातात, पद्धत योग्य नाही. अहवाल कमी वेळेत मिळत असल्याने नगरसेवकांना सखोल चर्चेची संधीच मिळत नाही. श्रद्धांजलीच्या ठरावावरही सत्ताधारी आमच्यावर चुकीचा आरोप करत आहेत. सभेची सुरुवात विषय क्रमांक एकपासून झाली. त्यानंतर विविध विषयांवर चर्चा झाली. ती सुरू होण्यापूर्वीच श्रध्दांजलीचा कार्यक्रम वेळेवर घेण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची होती. ती सत्ताधाऱ्यांना सांभाळता आली नाही, खापर मात्र विरोधकांवर फोडले जात आहे. त्यांनी कधीही समोरा-समोर यावे. सभागृहातील चर्चेदरम्यान विरोधी सदस्य उभे राहिले की सत्ताधारी सदस्यांकडून गोंधळ घातला जातो, नगरसेवकांना विषयावर मत मांडू दिले जात नाही, हे काही योग्य नाही.

आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या विकासकामांचाही उल्लेख वाटेगावकर यांनी केला. ते म्हणाले, शहराच्या विकासासाठी आमदार डॉ. भोसले यांनी सातत्याने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. पण त्यांच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. आम्हाला कोणाच्याही गुडबुकमध्ये जाण्याची गरज नाही. हा भाजप आहे, येथे सर्वच एकसमान असतात, त्यामुळे कोणी कोणाच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी धडपडत नाही. अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी पाठपुरावा केल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरपालिकेच्या शाळेत पीएम श्री शाळा योजनेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात स्थानिक आमदार, खासदार व केंद्र सरकारच्या योजनेचा आवश्यक प्रोटोकॉल पाळला गेला नाही. त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो नव्हता.

गुंड कोणासोबत हे सर्वांना माहिती

प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांना गुंड म्हणणे अत्यंत दुर्दैवी आहे. तो शब्दप्रयोग लोकशाहीला शोभणारा नसल्याची टीका त्यांनी केली. आमच्यासोबत गुंड नाहीत. नागरिक आहेत. गुंड कोणासोबत असतात, ते सगळ्यांना माहिती आहे, असा टोलाही वाटेगावकर यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT