Phaltan Election .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Election: फलटणमध्ये खरी फाईट रामराजे विरुद्ध रणजितसिहांमध्येच; अनिकेतराजे अन् समशेरसिंह निंबाळकर फक्त पडद्यावरचे कलाकार!

Ramraje Nimbalkar Vs Ranjitsinh Nimbalkar : आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करूनही घड्याळ चिन्ह मिळाले नसल्याने तुतारीला न्याय मिळेल अशी चर्चा असतानाच अचानक धनुष्यबाण हाती घेऊन अनिकेतराजेंना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवले.

Deepak Kulkarni

Phaltan News: पालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता गेली अनेक दिवस ताणली गेली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी राजे गटाकडून विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने, तर भाजपतर्फे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याशिवाय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांच्यासह अन्य उमेदवारांनीही नगराध्यक्षपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे काही दिवसांपासून नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी नगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने संधी दिली आहे. भोसले यांनी समशेरसिंह यांना पाठिंबा देत नगराध्यक्षपदाच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे पालिकेची निवडणूक पुन्हा एकदा दोन्ही नाईक निंबाळकर यांच्यात तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.

समशेरसिंह यांनी आमदार सचिन पाटील, सोमाशेठ जाधव, मनीषा नाईक निंबाळकर, सुपुत्र रणवीरराजे निंबाळकर, अशोकराव जाधव, सुकन्या ऐश्वर्या नाईक निंबाळकर आदींच्‍या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे प्रयत्न करूनही घड्याळ चिन्ह मिळाले नसल्याने तुतारीला न्याय मिळेल अशी चर्चा असतानाच अचानक धनुष्यबाण हाती घेऊन अनिकेतराजेंना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवले.

अनिकेतराजे निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सुभद्राराजे नाईक निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, मिलिंद नेवसे, विराज खराडे यांच्यासह दाखल केला. इतर घटक पक्षांना काही जागा देत संपूर्ण 27 जागांवर उमेदवार देऊन रामराजे नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेची सत्ता पुन्हा मिळविण्याचा चंग बांधला असल्याचे दिसते.

सकाळपासून पालिका कार्यालय परिसरात विविध राजकीय पक्ष, संघटना व अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक, नेते यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी आठ आणि नगरसेवकपदासाठी 187 असे 195 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात प्रभाग दोन आणि नऊसाठी सर्वाधिक म्हणजे 19 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक सहामध्ये सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले.

यावेळी बोलताना, आगामी काळात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणला महानगरपालिका बनवण्याचे आमचे व्हीजन आहे. सोबतच फलटण शहरातील प्रशासकीय दहशत आणि भीतीचे वातावरण संपवण्यासाठी माझी उमेदवारी आहे, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये उतरलो आहे. त्याचा निश्चितच फलटण शहराच्या विकासासाठी फायदा होईल, अशी प्रतिक्रिया अनिकेतराजेंनी दिली.

तर धूळमुक्त फलटण, खड्डेमुक्त फलटण व शहरातील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी, कचऱ्याचा प्रश्न सोडवण्‍यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

ही निवडणूक दोन घराण्यांची लढाई नसून सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आहे. पालिका आपल्या सामान्य व्यक्तीची वाटावी यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT