NCP members Shivanjali Bhosale, and two others, formally joining BJP in the presence of MP Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Panchayat Samiti : रामराजे गटाला गाफील ठेवलं, खर्डेकरांचा घात केला : फलटणमध्ये रणजितसिंहांकडून राष्ट्रवादी-शिवसेनेचा शेवटच्या क्षणी गेम

Phaltan Panchayat Samiti : फलटण पंचायत समितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अत्यंत गुप्त खेळीने राष्ट्रवादीला खिंडार पाडले.

Hrishikesh Nalagune

Phaltan Panchayat Samiti : फलटण पंचायत समितीत सोमवारी (16 मार्च) प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. सभापतीपदी निवड झालेल्या शिवांजली भोसले यांच्यासह राष्ट्रवादीच्या तिन्ही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सभापतीपदाचा अर्ज भरायला अर्धा तास बाकी असतानाच या घडामोडी घडल्या. आता हा पक्षप्रवेश राजे गटाला गाफील ठेवून आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते शिवरूपराजे खर्डेकर यांना अंधारात ठेवून झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

फलटण पंचायत समितीमध्ये राजे गटाला म्हणजेच शिवसेनेला 8 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने 5 आणि राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या होत्या. भाजप-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढविल्याने दोन्ही बाजूला 8-8 असे समसमान संख्याबळ झाले. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीवर सभापती-उपसभापतींची निवड होण्याची शक्यता होती. पण मागील दोन दिवसांपासून मंत्री मकरंद पाटील यांच्यासह खासदार नितीन पाटील यांनी फलटणमध्ये लक्ष घातले होते.

सोमवारी सभापती निवडीपूर्वी मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, सभापती शिवांजली भोसले यांचे वडील विक्रम भोसले आणि माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले हे संजीवराजे निंबाळकर यांच्या बंगल्यावर गेले. या बैठकीत सव्वा वर्षे-सव्वा वर्षे सभापतीपद वाटून घेण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. सव्वा वर्षांमध्ये सव्वा सात महिने राष्ट्रवादीला आणि सव्वा सात महिने भाजपला मिळणार असे निश्चित झाले.

सव्वा वर्षांचे सभापतीपद मिळणार म्हणून संजीवराजेही बिनविरोध निवडीसाठी तयार झाल्याचे सांगितले जाते. पण यानंतर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून गेम फिरवण्यात आला. संजीवराजेंसोबत चर्चा करून आलेल्या विक्रम भोसले, दिलीप भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सभापतीपदाचा अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी शिवांजली भोसले आणि राष्ट्रवादीच्या अन्य दोन सदस्यांनीही गुपचूप भाजपमध्ये प्रवेश केला.

या घडामोडीत संजीवराजे निंबाळकर यांना गाफील ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. तसेच रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांचेच जवळचे मित्र शिवरूपराजे खर्डेकर यांनाही तोंडघशी पाडल्याचे बोलले जाते. त्यामुळे खर्डेकर यांनी तातडीने राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पुढील सव्वा वर्षे किंवा कदाचित अडीचही वर्षे भाजपचाच सभापती राहू शकतो. या घडामोडींबाबत अद्याप राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सचिन पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT