Shahrukh Shaikh  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Encounter : लांबोटीतील युवकाच्या फोनवरून पत्नीला फोन केला अन्‌ तेथेच शाहरुख शेख फसला; पुण्यातील गुन्हेगाराचा मोहोळमध्ये एन्काउंटर

Notorious Criminal Death : तो नंबरप्लेट नसलेली स्कुटी घेऊन आला होता. तो सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. मात्र, त्याच्या वागणुकीबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती, असे शाहरूखच्या नातेवाईकांनी सांगितले.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 June : पुण्यातील फरारी सराईत गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी लांबोटी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे एन्काउंटर केला. पोलिसांचे पथक आल्यानंत शाहरूख शेखने स्वतःजवळील पिस्तूलमधून गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, लांबोटी येथील एका युवकाच्या फोनवरून शाहरूखने पत्नीला फोन केला आणि त्याच वेळी पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले, त्यावरूनच पोलिसांनी शाहरुखचे एन्काउंटर केले.

पुण्यातील काळेपडळ पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एका फिर्यादीवरून पुणे पोलिस (Pune Police) शाहरूख शेख याच्या मागावर होते. शाहरूख हा मोहोळ तालुक्यातील सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी येथे राहत असल्याची खबर पुणे पोलिसांना लागली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक शाहरूख याला पकडण्यासाठी शनिवारी रात्री सोलापूरकडे आले होते.

पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास लांबोटी येथे सापळून रचून शाहरूख शेख याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस आपल्याला पकडण्यासाठी आले आहेत, हे लक्षात येताच शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात (Firing) शाहरूख शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, शाहरूख शेख याच्यावर हडपसर, कोंढवा आणि वानवडी पोलिस ठाण्यात १५ पेक्षा गुन्हे दाखल आहेत. तो पुणे पोलिसांना चकवा देऊन फिरत होता. मात्र, सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात ते अखेर पोलिसांच्या हाती लागला. मात्र, पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

लांबोटीच्या नरुटे वस्ती येथे शाहरूख शेख याचा मावसभाऊ राजू अहमद शेख हा अनेक वर्षांपासून राहत आहे. शाहरूख शेख हा गेली आठ दिवसांपासून लांबोटीत मावसभावाकडे राहायला आला होता. तो नंबरप्लेट नसलेली स्कुटी घेऊन आला होता. तो सकाळी लवकर घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा घरी यायचा. मात्र, त्याच्या वागणुकीबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती, असे शाहरूखच्या नातेवाईकांनी सांगितले.

....अन्‌ शाहरूख फसला

शाहरुख शेख हा दिवसभर बाहेर फिरायचा. लांबोटी येथील एका युवकाकडून मोबाईल मागून त्याने पत्नीशी संवाद साधला आणि इथेच तो फसला. पोलिसांचे लक्ष शाहरूखच्या कुटुंबीयांवर होते. शाहरूखने पत्नीला केलेल्या कॉल ऐकला आणि त्या फोनच्या लोकेशनवर पोलिस शनिवारी रात्रीच पोहोचले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस शाहरूख झोपल्याच्या ठिकाणी दाखल झाले. दरम्यान शाहरूख शेख याने एका एटीएम केंद्रातून चार ते पाच वेळा पैसे काढल्याची माहिती मिळाली आहे.

लहान मुलाला घेऊन पोलिसांवर केला गोळीबार

शाहरूख शेख हा नातेवाईकाच्या लहान मुलाला जवळ घेऊन झोपला होता. पोलिस आल्याचे पाहताच त्यांने मुलाला कडेवर घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी लहान मुलाला कोणतीही इजा न होऊ देता अत्यंत कौशल्याने शाहरूख शेखवर गोळीबार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT