Ahmednagar Politics News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Politics : दुष्काळासारख्या विषयातही भाजप आमदार-पदाधिकाऱ्यांमध्ये कुरघोड्या सुरुच...

Pradeep Pendhare

Ahmednagar Politics News : पाथर्डी-शेवगावमधील दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षात कुरघोड्या सुरू असल्याचे दिसत आहे. या कुरघोड्या पदाधिकाऱ्यांमध्ये नसून ते आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रंगल्या आहेत. आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले, तर पाथर्डीतील भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाधिकारी गोकुळ दौंड यांनी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाकडे धाव घेत निवेदन दिले. यामुळे पाथर्डी-शेवगावमधील भाजपमध्ये नेमके चाललय तरी काय? अशी चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळाच्या प्रश्नावरून भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेत निवेदन दिले. पाथर्डी-शेवगावमध्ये यंदा अत्यल्प पाऊस पडला आहे. सर्व बंधार, पाझर तलाव, केटी वेअर बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे. शासकीय निकषांमध्ये येत असून देखील पाथर्डी-शेवगावला वगळण्यात आले आहे. कृषी, महसूल व मदत पुर्नवसन विभागाने बैठक घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी आमदार राजळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.

नगर जिल्ह्यात यंदा पाऊस सरासरीपेक्षा ५० टक्के कमी झाला आहे. राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. परंतु, नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा यात समावेश केलेला नाही. तालुक्यातील आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातील दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधत आहे.

आमदार नीलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची भेट घेवून निवेदन दिले. परंतु भाजप आमदार मोनिका राजळे यांनी थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तर पाथर्डी-शेवगावमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांची भेट निवेदन दिले. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाधिकारी गोकुळ दौंड आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे २२ नोव्हेंबरनंतर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

भाजप पदाधिकारी आणि आमदार यांनी दुष्काळावर वेगवेगळी ठिकाणी निवेदन दिल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. भाजप आमदार आणि पदाधिकारी यांच्यात अंतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी भाजपमध्ये गट-तटाचे राजकारण सुरू आहे. नगर दक्षिण कार्यकारिणी निवडीवेळी देखील हे राजकारण तापले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT