Maharashtra Politics Latest News : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही पक्षांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे, तर हा निकाल काहींच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे निकालानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत.
राज्यातील 2359 ग्रामपंचायतचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. या निवडणुका राजकीय पक्षांच्या पातळीवर अथवा पक्षांच्या चिन्हावर लढविल्या गेल्या नाहीत. स्थानिक नेत्यांनी आपल्या समर्थकांचे पॅनेल बनवून या निवडणुका लढवल्या. असे असताना भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाल्याचा दावा केला आहे.
भाजपने सर्वाधिक ७७८ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचा दावा केला आहे. त्या पाठोपाठ अजित पवार गटाला ४०७, शिंदे गटाला ३०१ ग्रामपंचायतींची सत्ता मिळाल्याची माहिती भाजपने दिली आहे. काँग्रेस, शरद पवार गटानंतर सर्वात कमी जागा या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाला मिळाल्याचा दावाही भाजपने केला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आम्हीच राज्यात आघाडीवर आहोत, असा दावा सत्तेतील सर्व पक्ष करत आहेत. जनतेची पसंती आम्हालाच आहे हा त्यांचा दावा खरा असेल आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खरोखर जनतेला सामोरे जाण्याची हिंमत असेल, तर पुढील दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात, असे आव्हान राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हे आव्हान देताना जगताप यांनी ग्रामपंचायत निवडणूक या कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आमचाच पक्ष एक नंबर, हा सत्तेतील पक्षांचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबतीत विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकांवर उत्तर सादर करायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. त्यामुळे जनता त्यांच्या लोकप्रतिनिधींपासून वंचित आहे. एका बाजूला जनतेला त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व नाकारण्याचे पाप हे सरकार करत आहे. दुसऱ्या बाजूला जनतेचा कौल आम्हालाच आहे, असा दावा करत आहे. हा दावा खरा असेल तर सरकार तातडीने महापालिका निवडणुका का घेत नाही? असा सवाल प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.