Sitaram Gaikar & Balasaheb Thorat
Sitaram Gaikar & Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पिंपळगाव खांड धरणावरून राजकारण पेटले : गायकर झाले थोरातांवर नाराज

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यात निळवंडे पाठापाठ आता पिंपळगाव खांड धरणावरून राजकारण तापू लागले आहे. या धरणातून संगमनेर तालुक्यातील 12 गावांना पाणी देण्याची तयारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी केली आहे. या प्रस्तावाला अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी विरोध न केल्याने त्यांची या मूक संमती समजली जात आहे. या प्रस्तावाच्या विरोधात पिंपळगाव खांड धरण पाणीबचाव संघर्ष समिती उभी ठाकली आहे. ( Politics ignited from Pimpalgaon sugar dam: Gaikar became angry with Thorat )

पिण्याच्या पाणी योजनांच्या नावाखाली पिंपळगाव खांड धरणातून पाणी पळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत निषेध करण्यासाठी पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे आज पिंपळगाव खांड धरण स्थळावर प्राथमिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

या धरणाच्या पाणी प्रश्नावर पिंपळगाव खांड धरण पाणीबचाव समितीच्या बाजूने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर उभे राहिले. त्यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराजी व्यक्त करत या धरणाच्या पाणी प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे सांगितले. तर समितीच्या कार्यकर्त्यांनी पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पळविणाऱ्यांना 'मुळा'चा दणका दाखवण्याचा इशारा दिला.

सीताराम गायकर म्हणाले की पठार भागाला मुळेचे पाणी मिळाले पाहिजे. मात्र यातून समन्वयाची भूमिका घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घेऊन यातून मार्ग काढू. पिंपळगाव खांडचे पाणी सर्वांना पुरेल इतके नाही. आणखी पाणी कसे निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी अजित पवारांकडे जाऊनच मार्ग काढता येईल. त्यांनीच पिंपळगाव खांड मार्गी लावले. त्यातून ते नक्की मार्ग काढतील. पिंपळगाव खांडच्या पाणी वाटपात कुणावरही अन्याय होणार नाही. या बाबत काळजी घेतली जाईल, असे गायकर यांनी सांगितले.

शेतकरी नेते दशरथ सावंत यावेळी म्हणाले की, बदल हा जनतेच्या रेटातूनच होतो जनतेचा हा प्रश सोडविण्यास एकजुटीने जन आंदोलन उभे करावे. यासाठी मी पुढे राहील आयत पाणी नेऊ नका. दुसरा के टी बांधाऱ्यातून पाणी न्या पण हक्कच पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार केला. अन्यथा जनतेची ताकद दाखवावी लागेल खरे तर मुळा नदीवर आणखी एक टीएमसी पाणी आडविण्याची गरज आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

पठार भागातील गावासाठी पाणी योजनांच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या साहित्याची तोडफोड करून त्यांना हाकलून लावू, असा इशारा पिंपळगाव खांडचे सरपंच विजय जगताप यांनी दिला.

पाण्यावाचून तडफडुन मारण्यापेक्षा आम्ही पिंपळगाव खांड धरणात उडी घेऊन आत्महत्या करू असा इशारा पांगरीचे सुदाम डोंगरे यांनी यावेळी दिला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख आणि बी जे देशमुख यांनी आमदार डॉ किरण लहामटे यांचेवर टीकेची तोफ डागली. आमदारांनी जनतेच्या मताचा आदर व विचार करावा पठाराला पाणी देताना परिसरातील जनतेचे मत जाणून घेणे आवश्यक होते मात्र त्यांनी तसे केले नाही, असा आरोप केला. त्यांना पाणी देण्यास आमचा विरोध नाही परंतु आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये. त्यांनी पिंपळगाव खांड धरणाचे खाली अनेक जलस्त्रोत आहेत. त्या ठिकाणी दुसरे बंधारे निर्माण करावे, त्यातून पठार भागाला पाणी द्यावे. त्याला आमचा विरोध नाही, असे सांगितले.

विकास शेटे यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब शेटे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT