Kolhapur Expansion News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : शहराच्या हद्दवाढीवरून कोल्हापुरात राजकारण तापलं ? मतदारसंघ शाबूत ठेवण्यासाठी नेत्यांची धडपड

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या मुद्द्यांवरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून माझ्या पद्धतीने हद्दवाढ करून घेतो, असे विधान केले. त्यानंतर प्रस्तावित 18 गावांत हद्दवाढ विरोधात संघर्षाची धार अधिक तीव्र झाली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी या 18 गावांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला असला तरी कोल्हापूरच्या विकासासाठी दक्षिण-करवीरमधील नेते मात्र याकडे दुर्लक्ष करताहेत की काय ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मुश्रीफ यांच्या विधानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हद्दवाढ विरोधात स्टेटस लावल्याने यामागे नेमकं कोण आहे ? अशी चर्चाही आता रंगली आहे.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. वाढलेली लोकसंख्या, उद्योगधंदे, शहरात होणारी वाहतूक कोंडी, अशा समस्यांवर उपाय म्हणून कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, अशी मागणी समोर आली होती. त्यासाठी प्रस्तावित 18 गावांचा अहवाल नगर विकास विभागाकडे देण्यात आला होता.

मात्र, त्याला अनेक गावांतून विरोध झाला. सुरुवातीला कोल्हापूरची 1951 पासून शहराची हद्द 66.82 चौरस किलोमीटर झाली. ती आजतागायत एवढीच आहे. त्यावर नगरपालिका, महानगरपालिका झाली, पण हद्द वाढली नाही. परंतु, आताची हद्दवाढ ही शहर विरुद्ध ग्रामीण अशा संघर्षाचे नवे कारण बनत आहे.

कोल्हापुरातील सर्वच राज्यकर्त्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवली असती, तर आतापर्यंत शहराची हद्दवाढ झाली असती. केवळ राज्यनियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व आमदार जयश्री जाधव यांना सोडले तर कोल्हापूर दक्षिण व करवीर विधानसभा मतदारसंघातील राज्यकर्त्यांनी या हद्दवाढीला विरोध केला आहे.

काहींनी उघड उघड, तर काहींनी छुप्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. विधानसभा निवडणुकीत आपला गड मजबूत ठेवण्यासाठी दक्षिण आणि करवीरच्या नेत्यांनी विरोध सुरू ठेवला असल्याचे बोलले जात आहे. आजदेखील 18 गाव बंद असताना, केवळ काँग्रेसचे कार्यकर्तेच या बंदमध्ये पुढे असलेले दिसले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या माजी पालकमंत्री सतेज पाटील यांची सत्ता आहे. आमदार ऋतुराज पाटील हे विधानसभेचे सदस्य त्या मतदारसंघातून आहेत, तर माजी आमदार अमल महाडिक यांनीदेखील या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांना मानणारा मोठा गट आहे. या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांची फळी मोठ्या प्रमाणात आहे, पण यांची समजूत काढण्याऐवजी त्यांना हद्दवाढविरोधात खत पाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.

केवळ राजकीय स्वार्थ पाहून यातील एकही नेता जाहीरपणे हद्दवाढचे समर्थन करत नसल्याचे चित्र आहे. उलट कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हद्दवाढीला विरोध करण्याचे काम सुरू आहे. माजी पालकमंत्री सतीश पाटील हे पटकन निर्णय घेऊ शकले असते, मात्र दक्षिणच्या राजकीय प्रेमापोटी त्यांनी तो निर्णय घेतला नाही. तर दुसरीकडे युतीच्या काळात राज्यातील दोन नंबरचे मंत्रिपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होते. त्यांनीदेखील दक्षिणच्या राजकारणासाठी निर्णय घेतला नाही.

करवीर विधानसभा मतदारसंघांमध्येदेखील तेच चित्र आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी उघड उघड हद्दवाढीला विरोध केला आहे. आमदार पी एन पाटील हेदेखील हद्दवाढीच्या विरोधात आहेत. आपल्या मतदारसंघाच्या प्रेमापोटी त्यांनी पहिल्यापासूनच हद्दवाढीला विरोध केला आहे. कॉलेजला जाताना केवळ माजी आमदार अमल महाडिक सोडले, तर हे सर्वजण शहरातच वास्तव्यात आहेत, पण त्यांचा ओढा आपापल्या मतदारसंघात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी, असे वारंवार बोलून दाखवले आहे, तर मंत्री हसन मुश्रीफ हद्दवाढ करण्याच्या भूमिकेत आहेत. राजकीय ताकद वापरली आणि राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर कोल्हापूरची हद्दवाढीचा प्रश्न लगेच मार्गी लागू शकतो हे नक्की.

'या' गावांना कोल्हापुरात घेण्याची शक्यता

कोल्हापूर शहरातील उपनगरातील वाढीव असल्यामुळे ग्रामीण भाग शहरात मिसळला आहे. त्यामध्ये नवे बालिंगे, वाडीपीर, कळंबा, पाचगांव, मोरेवाडी, कंदलगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, उचगाव यांचा समावेश आहे. ही नऊ गावे हद्दवाढीत पहिल्या टप्प्यात घेतली जाऊ शकतात. या गावांचा विकास चांगल्या पद्धतीने झाल्यास उर्वरित गावं स्वतःहून कोल्हापूर शहरात येण्यास तयार होतील.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT