कोल्हापूर : अत्यंत अटीतटीने लढले गेलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (kdcc bank) मतमोजणी शुक्रवारी (ता. ७) सकाळी आठपासून सुरू होणार आहे. या निकालात काही धक्कादायक निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यात नागरी सहकारी बॅंका आणि पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade), विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांचे भाऊ अर्जुन आबिटकर व विकास धनपाल हे नशिब आजमावत आहेत. या गटात धक्कादायक निकाल लागण्याची चर्चा एक दिवस अगोदरच रंगली आहे. याच गटात कोणी कोणाचा कार्यक्रम केला की पॅनेलचा धर्म पाळला, हे उद्या दिसणार आहे. (Possibility of shocking result from credit socity's group in Kolhapur District Bank)
दरम्यान, प्रक्रिया संस्था व पतसंस्था गटात मोठी चुरस असल्याने या गटातील निकालाबाबत राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. प्रक्रिया संस्था गटातून खासदार प्रा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हे विद्यमान संचालक विरोधी पॅनेलमधून रिंगणात आहेत; तर त्यांच्या विरोधात सत्तारूढ गटातून मदन कारंडे व प्रदीप पाटील-भुयेकर हे नशीब आजमावत आहेत. पतसंस्था गटात तिरंगी लढत असून, सत्तारूढ गटाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष रिंगणात उतरलेल्या संचालक अनिल पाटील यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे. या गटात विरोधी आघाडीकडून प्रा. अर्जुन आबिटकर व सत्तारूढ गटातून आमदार प्रकाश आवाडे रिंगणात आहेत.
महिला राखीव गटामध्ये माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे (शिवसेनाप्रणित), कॉंग्रेसकडून जिल्हा बॅंकेच्या राजकारणात नवोदित असणाऱ्या श्रृतिका काटकर आणि रेखा कुऱ्हाडे (शिवसेना प्रणित) निवडणूक रिंगणात आहेत. यामध्येही माने आणि शिंदे यांच्यामध्ये ही लढत चुरशीची होईल, अशी चर्चा आहे. एकूणच जिल्हा बॅंकेतील या चुरशीच्या गटासह इतर गटांचा निकाल काय लागणार हे उद्या (ता. 7) मतमोजणीनंतर कळणार आहे.
संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात होते. बुधवारी (ता. ५) या निवडणुकीसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान झाले. मतमोजणीसाठी ४० टेबलची सोय करण्यात आली आहे. एका केंद्रावरील मतपेटी एका केंद्रावर उघडून त्यातील मते मोजली जातील. प्रत्येक टेबलवर तीन याप्रमाणे प्रत्यक्ष मोजणीसाठी १२०, तर राखीव ४० असे एकूण १६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आजरा तालुका विकास संस्था गटातील निकाल पहिला लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित पाच तालुक्यांतील विकास संस्था गटांचे निकाल जाहीर होतील. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल बाहेर येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
शेवटचा टप्पा महत्वाचा ठरणार
विकास संस्था गटातील सहा जागांसाठी मतदान झाले आहे. यापैकी पन्हाळा व गडहिंग्लज तालुक्यात निकालाची औपचारिकता बाकी आहे. उर्वरित आजरा, शिरोळ, भुदरगड व शाहूवाडीत मोठी चुरस आहे. या चारही तालुक्यांत चार-पाच मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे. शेवटच्या टप्प्यात ‘जोडणी’त कोण यशस्वी झाला, यावर या चार तालुक्यांतील विजय कोणाचा, हे अवलंबून आहे.
विरोधी पॅनेलाची मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप
प्रत्येक केंद्राची स्वतंत्र टेबलवर मतमोजणी होणार असल्याने तालुक्यात कोणाला किती मते मिळाली, याची माहिती मिळणार आहे. या मोजणी प्रक्रियेला विरोधी पॅनेलने विरोध करून इतर गटातील सर्व तालुक्यांतील मते एकत्रित करून त्याची मोजणी करण्याची मागणी केली. याबाबत प्राधिकरणाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे राखीव गटातील मतमोजणी एकत्रित करून होणार की तालुकानिहाय होणार, याचा निर्णय मतमोजणी सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.