prajakt tanpure
prajakt tanpure Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्राजक्त तनपुरे म्हणाले, भाजपला आंदोलनाचा अधिकार नाही...

विलास कुलकर्णी

राहुरी ( अहमदनगर ) : महावितरण प्रशासनाकडून राज्यात थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. या मोहिमे विरोधात भाजपने आंदोलने सुरू केली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांनी तर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गावातील महावितरण कार्यालयातच आंदोलन केले. यावर मुळा धरण येथील पत्रकार परिषदेत बोलताना प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांच्यावर जोरदार टीका केली. Prajakt Tanpure said, BJP has no right to agitate ...

प्राजक्त तनपुरे म्हणाले, राज्यात भाजप सरकारच्या काळात महावितरणची आर्थिक कोंडी केली. आता केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीयीकृत बँकांवर निर्बंध लादून वीज कंपन्यांची आर्थिक गळचेपी सुरू आहे. महावितरणची कोंडी करण्याचे भाजपचे धोरण संशयास्पद आहे. त्यामुळे भाजपला महावितरणविरुद्ध आंदोलनाचा अधिकार नाही, अशा शब्दांत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांच्या आंदोलनाचा समाचार घेतला.

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, की राज्यात भाजप सरकारच्या काळात पाच वर्षांत कृषिपंपांची तीस हजार कोटींची वीजबिल थकबाकी झाली. शेतकऱ्यांकडून वीजबिल घ्यायचे नाही, ही भूमिका रास्त आहे; परंतु शासनातर्फे महावितरण कंपनीला तुटपुंजी आर्थिक मदत केली.

राज्यात भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळात कृषिपंपांची तीस हजार कोटींची थकबाकी झाली. त्या तुलनेत शासनातर्फे निम्म्या वीजबिलाची आर्थिक मदत महावितरणला अपेक्षित होती. भाजप सरकारने अवघ्या चार-पाच हजार कोटींची तुटपुंजी मदत करून महावितरणची आर्थिक कोंडी केली. नंतर कोरोना संकटात वीजबिल वसुली घटली. महावितरणची आर्थिक स्थिती बिघडली.

महावितरणची आर्थिक घडी सुरू ठेवण्यासाठी बँकांचे कर्ज घेण्याशिवाय अन्य पर्याय नाही. त्यावरही केंद्र सरकारने नवीन परिपत्रकाद्वारे, वार्षिक महसुलाच्या 25 टक्क्यांपर्यंत खेळते भांडवल द्यावे, असे निर्बंध घातले आहेत. महावितरणने 25 टक्क्यांचा आकडा कधीच ओलांडला आहे. केंद्र सरकार महावितरण कंपनीला कोळसा उधारीवर देत नाही. कंपनी जिवंत ठेवण्यासाठी ग्राहकांकडून थकीत वीजबिलांची वसुली, एवढाच पर्याय ठेवला आहे. त्यामुळे कृषी धोरणांतर्गत शेतकऱ्यांना साठ ते सत्तर टक्के सूट देण्याची योजना राबविली जात आहे, असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

मतदारसंघात मागील दोन वर्षांत नवी 225 रोहित्रे बसविली. भाजपचे तत्कालीन आमदार कर्डिले यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एवढी रोहित्रे बसविली नाहीत. वीजविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कानडगाव व जांभळी येथील नवीन वीज उपकेंद्र उभारणीच्या कामाचा प्रारंभ पुढील आठवड्यात करणार आहे.

- प्राजक्त तनपुरे, ऊर्जा राज्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT