Amol Shinde-Praniti Shinde-Manoj Jarange Patil
Amol Shinde-Praniti Shinde-Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : ‘निवडणुकीत जरांगेंसोबत फोटो काढण्यासाठी धडपडणाऱ्या प्रणिती शिंदेंनी मराठ्यांची फसवणूक केली’

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 June : मराठा समाजाच्या मतांवर निवडून आलेल्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी समाजाची फसवणूक केली आहे. निवडणुकीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपडणाऱ्या प्रणिती यांनी आरक्षणाच्या मुद्यावर उपोषण करणारे जरांगे यांना पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र, तसं होताना दिसत नाही, ही मराठा समाजाची फसवणूक आहे, असा हल्लाबोल शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti shinde) या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. ज्या मराठा समाजाच्या (Maratha community) मतांवर आणि जिवावर त्या निवडून आल्या आहेत, त्या मराठा समाजाचा त्यांना विसर पडला आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा; म्हणून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी जाऊन प्रणिती शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता. मात्र, तसे होताना दिसत नाही, असे अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, लोकसभा मतदानाच्या आधी मनोज जरांगे पाटील हे सोलापूरला आले होते. त्या वेळी निवडणूक सुरू होती, त्यामुळे जरांगे पाटील यांचे बुके देऊन स्वागत करण्यासाठी, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी कशा पद्धतीने धडपड करत होत्या, हे सोलापूर आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. यावरून असं लक्षात येतं की मराठा समाजाची ही फसवणूक आहे.

आपण खासदार म्हणून ज्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं आहे. त्या लोकप्रतिनिधीला मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कुठलंही आणि कसलंही देणं घेणं नाही, हे आपल्याला दिसून येत आहे. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे, असेही शिंदे यांनी म्हटलं आहे.

वास्तविक मराठा समाजाच्या वाईट काळात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत उभं राहण्याची भूमिका प्रणिती शिंदे यांनी घ्यायला हवी होती. आपण मराठा समाजाच्या जिवावर खासदार झालो आहोत, हे लक्षात घेऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असता, तर मराठा समाजाला धन्यता वाटली असती. मात्र, तसे होताना दिसत नाही, त्यामुळे मराठा समाजाने वेळीच सावध होऊन अशा लोकांपासून सावध व्हायला पाहिजे, असा सल्लाही अमोल शिंदे यांनी खासदार प्रणिती शिंदेंना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT