Solapur First Women MP : आईची संधी थोडक्यात हुकली...पण लेकीने इतिहास घडविला; प्रणिती शिंदे बनल्या पहिल्या महिला खासदार!

Solapur Lok Sabha Election 2024 : सोलापुरात 1951 पासून 2019 पर्यंत सर्व पुरुष खासदार झाले आहेत. प्रणिती शिंदेंच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांच्या माध्यमातून 2004 मध्ये ती संधी निर्माण झाली होती.
Praniti shinde
Praniti shindeSarkarnama

Solapur, 05 June : सोलापूर जिल्ह्याच्या 73 वर्षांच्या राजकीय इतिहासात प्रणिती शिंदे यांच्या रुपाने प्रथमच महिला खासदार निवडून आल्या आहेत. सोलापुरात 1951पासून 2019 पर्यंत सर्व पुरुष खासदार झाले आहेत. प्रणिती शिंदेंच्या मातोश्री उज्ज्वला शिंदे यांच्या माध्यमातून 2004 मध्ये ती संधी निर्माण झाली होती. मात्र, भाजपच्या सुभाष देशमुख यांच्याकडून उज्ज्वला शिंदे यांचा 5798 मतांनी पराभव झाला आणि सोलापूरची पहिली महिला खासदार होण्याची संधी थोडक्यात हुकली. मात्र, त्यांची लेक प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या राजकीय इतिहासात नाव कोरत ती संधी साधली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपचे राम सातपुते यांचा 74 हजार 197 मतांनी दणदणीत पराभव करत विजय मिळविला. त्यांचा हा विजय अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. एक तर त्यांनी भाजपची गेली दहा वर्षातील विजयाची परंपरा खंडित केली. दोन वेळा सुशीलकुमार शिंदे आणि एक वेळा उज्ज्वला शिंदे (Ujjwala Shinde) यांच्या झालेल्या पराभवाचे उट्टे काढले. सोलापूरमधून भाजपची होऊ घातलेली विजयाची हॅट्‌ट्रीक रोखली. सर्वांत महत्वाचे म्हणजे सोलापूरच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून येण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूरमध्ये 1951 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे हे निवडून आले होते. त्यानंतर 1957 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीचे जयवंतराव मोरे हे निवडून आले. त्यानंतर सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनत गेला. कारण 1962 च्या निवडणुकीत मेडप्पा ऊर्फ आप्पासाहेब काडादी हे प्रथमच काँग्रेस पक्षाकडून निवडून आले. त्यानंतर 1991 पर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सातत्याने काँग्रेसचे उमेदवार निवडून येत गेले.

आप्पासाहेब काडादी यांच्यानंतर 1967, 1971 आणि 1977 या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर सूरजरतन दमाणी हे सोलापूरमधून निवडून आले होते. दमाणी यांच्यानंतर 1980 आणि 1984 या दोन निवडणुकांमध्ये गंगाधर कुचन हे काँग्रेसकडून खासदार झाले. पुढे धर्माण्णा सादूल हे 1989 आणि 1991च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले.

Praniti shinde
Solapur Loksabha 2024 Result : 'बीडचं पार्सल...' ; मोहिते पाटलांनी सोलापूरमध्ये आपला शब्द खरा करून दाखवला!

लोकसभेच्या 1996 मध्ये झालेल्या निवडणुकीत इतिहास घडला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करत भाजपचे लिंगराज वल्याळ हे निवडून आले होते. सोलापूर आणि कदाचित पश्चिम महाराष्ट्रातून भाजपकडून निवडून येणारे वल्याळ हे पहिले खासदार ठरले होते. मात्र, दोन वर्षांनी म्हणजे 1998 आणि 1999 मध्ये झालेल्या दोन निवडणुकांत सुशीलकुमार शिंदे हे खासदार म्हणून निवडून आले.

पुढे 2003 मध्ये सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या रिक्त जागेवर आनंदराव देवकते यांना काँग्रेसकडून तिकिट देण्यात आले. मात्र, त्या निवडणुकीत भाजपचे प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. पुढील 2004 च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना लोकसभेचे तिकिट देण्यात आले. मात्र, भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा 5798 मतांनी पराभव झाला आणि सोलापूरची महिला खासदार होण्याची उज्ज्वला शिंदे यांची संधी गेली.

Praniti shinde
Madha Lok Sabha Result : बहादुरी दिखाने की चीज नही है, बहादूर तब बनो जब जरुरत हो ; मोहिते पाटलांनी लढून दाखवलं...

सुशीलकुमार शिंदेंनी 2009 मध्ये पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली. मात्र, 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. सोलापूरमध्ये 2014 मध्ये शरद बनसोडे, तर 2019 मध्ये डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. मात्र, 2024 च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव करत सोलापूरचा गड काँग्रेसच्या ताब्यात मिळविला. याशिवाय त्या सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार बनल्या.

सोलापूरच्या 73 वर्षांच्या राजकीय इतिहासात 2004 मध्ये उज्ज्वला शिंदे यांना पहिली महिला खासदार होण्याची संधी मिळाली होती. मात्र, अटीतटीच्या लढतीत त्यांचा सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव अवघ्या 5798 मतांनी पराभव झाला आणि पहिली महिला खासदार होण्याची त्यांची संधी गेली. आईची गेलेली संधी आमदार प्रणिती शिंदे यांनी साधत सोलापूरची पहिली महिला खासदार होण्याचा मान मिळविला आहे.

Praniti shinde
Solapur Lok Sabha Vishleshan : ‘फ्लाॅवर समझा क्या....फायर हूँ..’; प्रणिती शिंदेंनी निकालातून दाखवले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com