Solapur, 13 November : लोकसभा निवडणुकीत सुसाट सुटलेली महाविकास आघाडीची गाडी विधानसभेत मात्र धक्के खाऊ लागली आहे. जागा वाटपापासून सुरू झालेला वाद प्रचाराचा शेवटाचा टप्पा आली तर थांबायचे नाव घेत नाही. महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरातील सभेत काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे यांना जाहीररित्या कानपिचक्या देऊन दोन दिवस उलटले तरीही त्या शिवसेना उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीची गाडी रुळावर येईल, अशी कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीत सोलापूर (Solapur) मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) या निवडून आल्या. त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी जोमाने काम केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर प्रणिती शिंदेंसाठी सोलापुरात सभा घेतली होती. तसेच, शिवसैनिकांनीही शिंदेंचे काम केले होते.
विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच दिसून आली. सोलापूर दक्षिण मतदारसंघावर काँग्रेससोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Shiv sena UBT) दावा केला.
दक्षिण सोलापूरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र, काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून समजूत घालण्यात आल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र, ते अपक्ष आमदार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या सोलापुरातील प्रमुख नेत्या असूनही प्रणिती शिंदे या सोलापूर जिल्ह्यातील प्रचारापासून लांब आहेत. नाही म्हणायला त्यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी काल आणि आज सभा, रॅली घेतली आहे. तसेच, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अक्कलकोटमधील सभेलाही त्या उपस्थित होत्या. मात्र, महाआघाडीतील मित्रपक्ष शिवसेनेचे उमेदवाराच्या प्रचारात त्या अजूनही सहभागी झालेल्या नाहीत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अमर पाटील यांच्यासाठी सोलापुरात सभा झाली. त्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी केलेल्या कामाची आठवण करून देत प्रणिती शिंदे यांना सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांचा प्रचार करण्याचे आवाहन केले होते.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या दोन ते तीन सभा सोडून मी प्रणिती शिंदे यांच्यासाठी सोलापुरात आलो होतो, त्यामुळे प्रणिती शिंदे यांनीसुद्धा अमर पाटील यांच्या प्रचारात आता उतरलं पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे प्रणिती शिंदे यांचे कान टोचले होते.
उद्धव ठाकरे यांनी जाहीररित्या कानपिचक्या देऊनही प्रणिती शिंदे या अद्यापपर्यंत (बुधवारपर्यंत) महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आलेले नाही.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघपणे काम करताना दिसून आली. त्याचे परिणाम राज्यात महाआघाडीने ३१ जागा जिंकण्यामध्ये झाले हेाते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले, ती ठिणगी विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली तरी कायम असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.