Praniti Shinde-Anand Chandanshive-Dattatraya bharane
Praniti Shinde-Anand Chandanshive-Dattatraya bharane sakarnama
पश्चिम महाराष्ट्र

प्रणितींनी राष्ट्रवादीत वादाची वात पेटवली, पण मुरब्बी दत्तामामांनी विझवली!

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहराच्या राजकारणात सध्या काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना सुरू आहे आहे. माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळच्या अनेक दिग्गज नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आपल्या जाळ्यात ओढत आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत नक्की चाललंय तरी काय? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

सोलापूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित असलेल्या स्मारक व वास्तूचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन आज (ता. ६ मार्च) पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. देशाच्या राजकारणात दलित चेहरा म्हणून ओळख असलेले माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही सर्व जबाबदारी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी लिलया पार पाडली.

आजच्या कार्यक्रमात माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार शिंदे यांचे नाव पत्रिकेत व पालकमंत्री यांच्या दौऱ्यात नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. सुरुवातीला बहुजन समाज पक्ष त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याच्या प्रयत्नात असलेले नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज आवर्जून हजेरी लावली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी सोलापुरातील नॉर्थकोट मैदानावर साकारल्या जाणाऱ्या संविधान भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज झाले. सोलापुरातील आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम झाल्याचा आरोप अनेकांनी केला. अनेकांनी या कार्यक्रमाला विरोधही केला. पालकमंत्री भरणे यांनी मात्र दिलेला शब्द पाळत आज या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यादेखील आयत्यावेळी उपस्थित राहिल्या होत्या.

प्रणिती शिंदे भाषणादरम्यान सोलापूर शहर उत्तरचे आमदार म्हणून नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा आवर्जून उल्लेख केला. माजी महापौर महेश कोठे हे शहर उत्तरमधून राष्ट्रवादीकडून येतील, ही शक्यता असताना आमदार प्रणिती शिंदे यांनी चंदनशिवे यांच्या नावाचा टायमिंग बॉम्ब आजच्या सभेत फोडला. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या मेगाभरतीला आमदार प्रणिती शिंदे यांनी भेदण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. त्याच वेळी व्यासपीठावर असलेले मुरब्बी पालकमंत्री भरणे यांनी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना आणखीन काम करण्याचा सल्ला दिला. नगरसेवक चंदनशिवे मागतील त्याप्रमाणे पालकमंत्री भरणे यांनी आजपर्यंत निधी दिल्याचे सोलापूर शहर व जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे पालक मंत्री भरणे यांचा सल्ला नगरसेवक चंदनशिवे मनणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आजच्या कार्यक्रमातून माजी महापौर महेश कोठे व नगरसेवक आनंद चंदनशिवे या दोघांचाही मेळ घालण्यात पालकमंत्री भरणे यशस्वी ठरल्याचे दिसते. पालकमंत्री भरणे यांनी आज सोलापुरात विविध विकास कामांचे उद्‌घाटन केले. अनेक कार्यक्रमांमध्ये आमदार प्रणिती शिंदे या सोबत होत्या. पालकमंत्री भरणे आणि आमदार शिंदे ज्या ज्या वेळी सोबत येतात, त्या त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये आलेल्या नेत्यांमध्ये खटके उडाल्याचे चित्र दिसले. सोलापूर शहरात सध्या नक्की काय चालले आहे, याबद्दल शंका-कुशंका व्यक्त होत आहेत.

राष्ट्रवादी प्रवेशाची प्रतीक्षा

माजी महापौर तथा नगरसेवक महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह सोलापूर महापालिकेतील काँग्रेस, शिवसेना व भाजपमधून राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांचा कालावधी आज संपला आहे, त्यामुळे या इच्छुकांना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका आता बसणार नाही. या इच्छुक नेत्यांचा प्रवेश राष्ट्रवादीत कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT