Sachin Kalyanshetti-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sachin Kalyanshetti Vs Praniti Shinde : ‘प्रणितीताई, शब्द जपून वापरा; आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल’; कल्याणशेट्टींचा इशारा

Solapur Lok sabha Election Result : कोणाची सत्ता असताना सोलापूरमध्ये दंगली घडल्या आहेत, हे प्रणिती शिंदे सोयीस्करपणे विसरत आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 16 June : सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता मेळाव्यात बोलताना ‘मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपचा सोलापुरात दंगली घडविण्याचा प्रयत्न होता’ असा खळबळजनक आरोप केला होता. खासदार शिंदेंच्या त्या आरोपाला भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सडेतोड उत्तर देताना ‘दंगलींचा विषय काढायचा झाला तर गोष्ट खूप लांबपर्यंत जाईल. बोलताना शब्द जपून वापरा; अन्यथा आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल’ असा इशाराही दिला आहे.

आमदार कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) म्हणाले, कोणाची सत्ता असताना सोलापूरमध्ये (Solapur) दंगली घडल्या आहेत, हे प्रणिती शिंदे (Praniti shinde) सोयीस्करपणे विसरत आहेत. कुणाच्या पिलावळीनं सोलापुरात दंगली घडवल्या, हेदेखील सोलापूरकरांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे दंगलींबाबतचा विषय काढायचा झाला तर गोष्टी खूप लांबपर्यंत जातील.

प्रणिती शिंदे ह्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर विकासाबद्दल न बोलता, लोकांना जाती-पाती धर्मांमध्ये अडकून भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणुकीच्या कालावधीत मुद्याचं बोला म्हणणाऱ्या प्रणिती शिंदे आता तुम्ही मुद्द्याचं बोला, असे आवाहनही कल्याणशेट्टी यांनी प्रणिती शिंदे यांना केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना तुम्ही आमची लाज काढता. प्रणिती शिंदे, आपण खासदार आहात, तेव्हा शब्द जपून वापरा. आम्ही बोलायला लागलो, तर खूप महागात पडेल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व सक्षम आहे, त्यांच्या कालावधीत एकही दंगल सोलापुरात घडली नाही. सर्व अप्रिय घटना काँग्रेसच्या काळात घडल्या आहेत. या उलट सोलापूर शांततेत ठेवण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे, असा दावाही सचिन कल्याणशेट्टी यांनी केला.

काय म्हणाल्या होत्या प्रणिती शिंदे?

सोलापूर लोकसभेची निवडणूक भाजपच्या हातातून गेलेली आहे, असे भाजप नेत्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर भाजपच्या लोकांनी आता एकच उपाय आहे, सोलापूरमध्ये दंगली घडवा. लोकांमध्ये विभागणी करा, पेटवापेटवी करा आणि निवडून या, असं स्थानिक नेत्यांना सांगण्यात आलं होतं. त्यासाठी तुम्ही भाजप नेत्यांची मतदानाच्या आधीची पाच दिवसांची भाषणं बघा. त्यात तुम्हाला पुरावा मिळेल, ते कशी लावालावी करत होते, असा गौप्यस्फोट प्रणिती शिंदे यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT