Rajendra Raut Nomination Form Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : राजेंद्र राऊतांचा अर्ज भरायला प्रशांत परिचारकांची दांडी; उमेदवारी डावल्याने नाराजीच्या चर्चेला उधाण

Solapur Vidhan Parishad Election सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने राजेंद्र राऊत यांना उमेदवारी दिली. अर्ज दाखलवेळी प्रशांत परिचारक गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Vijaykumar Dudhale, विश्वभूषण लिमये

Solapur, 01 June : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अनेक दिग्गजांना मागे टाकून राऊतांनी उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले, त्यांनी आज (ता. १ जून) आपला उमेदवारी अर्ज भरला. मात्र या वेळी उमेदवारीसाठी तीव्र इच्छूक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक गैरहजर होते, ती प्रकर्षाने जाणवले. त्यांच्या अनुपस्थितीची एकच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

सोलापूर (Solapur) विधान परिषदेसाठी महायुतीकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, राम सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवर इच्छूक हेाते. महायुतीकडे, विशेषतः भाजपकडून बहुमतासाठीचे भरभक्कम संख्याबळ आहे, त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे सोलापूरच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम होता.

भाजपकडून रविवारी रात्री ११ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोलापूरसाठी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नावाचा समावेश होतो. या जागेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) हेही इच्छूक होते. कारण त्यांनी विधानसभेच्या दोन निवडणुकीतून माघार घेतली होती, तसेच तत्काली पक्षश्रेष्ठींना त्यांना त्याबाबतचा शब्द दिला होता, त्यामुळे परिचारकांचे नावही आघाडीवर होते. मात्र, राजेंद्र राऊत यांनी अखेर बाजी मारली.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. या वेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे, दिलीप माने, संजयमामा शिंदे, राम सातपुते, मनीष देशमुख उपस्थित होते.

राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरायला जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे सर्व नेतेमंडळी, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या वेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. उमेदवारीत डावलल्यामुळे परिचारक हे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे.

प्रशांत परिचारकांना भेटायला पंढरपुरला जाणार : राजेंद्र राऊत

माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भेटायला जाणार आहे, ते आमचे मार्गदर्शक आहेत, आमचं फोनवरून बोलणंही झालं आहे. उमेश परिचारक हे उमेदवारी अर्ज भरायला येणार होते. पण, काही कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत, असे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT